रणजी ट्रॉफी : तेजराणाचे अर्धशतक, दर्शनचे ४ बळी

पणजी : गोवा व सौराष्ट्र यांच्यातील रणजी ट्रॉफी एलिट गटातील सामना रविवारपासून राजकोट येथील निरंजन शहा स्टेडियम ग्राऊंड सी येथे प्रारंभ झाला. सोमवारी सामन्याच्या दुसर्या दिवशी सौराष्ट्रने पहिल्या दिवसाच्या ४ बाद ३१७ धावांवरून पुढे खेळताना आपला पहिला डाव ७ बाद ५८५ असा घोषित केला. पहिल्या दिवशी ८८ धावांवर नाबाद राहिलेल्या प्रेरक मांकडने १५५ धावा केल्या. सम्मार गज्जार यानेदेखील शतक झळकावत ११६ धावा केल्या. हेत्विक कोटक (५०) याच्या अर्धशतकानंतर सौराष्ट्रने आपला पहिला डाव घोषित केला. गोवा संघाकडून डावखुरा अनुभवी फिरकीपटू दर्शन मिसाळ सर्वांत यशस्वी ठरला. त्याने १९५ धावांत ४ गडी बाद केले.
सौराष्ट्रच्या विशाल धावसंख्येला उत्तर देताना गोव्याने दुसर्या दिवसअखेर २ बाद १२५ अशी मजल मारली आहे. सुयश प्रभुदेसाई (०) व मंथन खुटकर (१८) यांना गोव्याने गमावले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेला गोव्याचा कर्णधार स्नेहल कवठणकर (४) याला पाठदुखीमुळे ‘रिटायर्ड हर्ट’ होत मैदान सोडावे लागले. त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याने उपचारानंतर मंगळवारी तो फलंदाजीस उतरणे अपेक्षित आहे. दिवसाचा खेळ संपला त्यावेळेस आक्रमक खेळाडू अभिनव तेजराणा ७५ धावांवर नाबाद होता. ८८ चेंडूंचा सामना करताना त्याने ९ चौकार व २ षटकार लगावले होते. अष्टपैलू ललित यादव २३ धावा करून त्याला साथ देत होता.