
वास्को : गोव्यातील (Goa) बायणा, वास्को (Baina,Vasco) येथे सशस्त्र दरोडा (Armed Dacoity) टाकण्यात आला. चामुंडी आर्केड इमारतीच्या सातव्या मजल्यावर शस्त्रे व रॉड घेऊन एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. त्यात सागर नायक, त्याची पत्नी व मुलगी जखमी झाले.
सागर याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखल करण्यात आले आहे. सात जणांनी मिळून हा दरोडा टाकला असून, सोने व रोख रक्कम घेऊन अज्ञात दरोडेखोर पळाले.
दरोड्याची माहिती मिळताच वास्को पोलिसांनी (Goa Police) घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक गुरुदास कदम, दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा घटनास्थळी दाखल झाले. विविध पोलीस स्थानकातील पथकेही घटनास्थळी दाखल झाली आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ बोलावून घेऊन तपास केला.
यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी सांगितले की, काल रात्री वरील दरोडा टाकण्यात आला आहे.
दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात कुटुंबीय जखमी झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यावर अधिक माहिती देणे शक्य होणार असल्याचे सांगितले.