आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी युवतीविरुद्ध गुन्हा नोंद

मडगाव : प्रेयसीने बोलणे बंद करून संबंध तोडले. यातून मानसिक तणावाखाली आलेला प्रियकर तिच्या घरी गेला असता, तिच्या कुटुंबियांनी त्याच्याविरोधात आत्महत्या (Suicide) करण्याची धमकी देत असल्याची तक्रार नोंद केली.
यामुळे मानसिकरीत्या खचलेल्या युवकाने रेल्वेखाली आत्महत्या केली होती. याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी (Konkan Railway Police) संशयित दिक्षिता नाईक (Dixita NaiK) (रा. खोर्ली) हिच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुठ्ठाळी येथील रेल्वेरुळावर साईराज कुंडईकर या 22 वर्षीय युवकाने 10 नोव्हेंबरला आत्महत्या केली होती. त्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी संशयित दिक्षिता नाईक (रा. खोर्ली) हिच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साईराज कुंडईकर याने रेल्वेखाली आत्महत्या केली होती. या प्रकरणात साईराज यांच्या वडिलांनी आनंद कुंडईकर यांनी त्याच्या आत्महत्येला दिक्षिता जबाबदार असल्याचे सांगितले.
दिक्षिताने संबंध तोडल्यामुळे साईराज तणावाखाली
साईराज व दिक्षिता यांच्यात मैत्रीपूर्ण जवळीक होती. मात्र काही कालावधीनंतर दिक्षिता हिने साईराज याच्याशी बोलणे बंद केले व संबंध तोडले. यातून साईराज मानसिक तणावाखाली गेला व तिच्या घरी बोलण्यासाठी गेला असता, तिच्या घरातील मंडळींनी त्याच्याविरोधात आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याची तक्रार नोंद केली होती.
व्हिडिओ करून युवकाने संपविले जीवन
या प्रसंगाने आणखी मानसिक तणावात जात साईराज याने मृत्यूपूर्वी सर्व घटनेचा व्हिडिओ व संदेश तयार केलेला होता व त्यानंतर आत्महत्या केली. मयत साईराजच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, संशयित दिक्षिता हिच्याविरोधात गुन्हा नोंद केलेला आहे