राज्यात पुन्हा सशस्त्र दरोडा!

बायणातील चामुंडी आर्केडमधील घटना : लाखो रुपयांचा ऐवज लंपास : निवृत्त कर्मचाऱ्यासह पत्नी, मुलीला मारहाण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th November, 10:03 pm
राज्यात पुन्हा सशस्त्र दरोडा!

वास्को : बायणा येथील चामुंडी आर्केड इमारतीत मंगळवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी थरारक धाड टाकली. सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या सागर नायक यांच्या फ्लॅटमध्ये घुसून ६-७ जणांच्या टोळीने लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लुटली. यावेळी दरोडेखोरांनी नायक कुटुंबियांना लोखंडी सळीने बेदम मारहाण केली.

चामुंडी आर्केड इमारतीच्या ‘बी’ ब्लॉकमधील सहाव्या मजल्यावर सागर नायक आपल्या कुटुंबासह राहतात. मंगळवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास ६ ते ७ दरोडेखोरांनी इमारतीच्या मागील बाजूने प्रवेश केला. यासाठी त्यांनी लाकडी शिडीचा वापर करून कुंपण ओलांडले आणि लिफ्टने सहावा मजला गाठला. त्यांनी मुख्य दरवाजा न फोडता स्वयंपाकघरालगत असलेल्या स्टोअर रूमचे शटर तोडले आणि खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला. दरोडेखोरांनी ओळख लपवण्यासाठी हेल्मेट आणि मास्क परिधान केले होते. सागर नायक मुरगाव बंदर प्राधिकरणाचे निवृत्त कर्मचारी आहेत. याशिवाय ते आईस्क्रिम वितरक असून त्यांची मार्केटींग एजन्सी आहेत.

चाव्यांसाठी लोखंडी सळीने मारहाण

दरोडेखोर बेडरूममध्ये घुसताच सागर यांना जाग आली. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी सळीने प्रहार केला, ज्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. यावेळी त्यांची पत्नी हर्षा आणि मुलगी नक्षत्रा यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. दुसऱ्या खोलीत झोपलेल्या वृद्ध सासूलाही पलंगावरून खाली पाडल्याने त्या बेशुद्ध झाल्या. तिजोरीच्या चाव्या देण्यासाठी सागर यांनी नकार दिल्यावर त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. अखेर पतीचा जीव वाचवण्यासाठी हर्षा यांनी चाव्या दिल्या.

दागिने आणि रोकड लुटली

चाव्या मिळताच दरोडेखोरांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, देवाचे दागिने आणि रोकड घेऊन पळ काढला. दिवाळी आणि पर्तगाळ मठाच्या उत्सवासाठी हे दागिने घरात आणून ठेवले होते. पळून जाताना त्यांनी हर्षा यांच्या अंगावरील दागिनेही हिसकावून घेतले. तसेच जाताना फ्रीजमधील आईस्क्रीमचा बॉक्सही सोबत नेला. अवघ्या अर्ध्या तासात ३ वाजून ५ मिनिटांनी त्यांनी पोबारा केला.

मुलीने दाखवला प्रसंगावधान

जाण्यापूर्वी दरोडेखोरांनी सर्वांच्या तोंडात कापडाचे बोळे कोंबून हात बांधले होते. दरोडेखोर गेल्यानंतर मुलगी नक्षत्रा हिने स्वतःची सुटका करून घेतली आणि खिडकीतून बाहेर येत खालच्या मजल्यावरील काकांकडे व शेजाऱ्यांकडे मदत मागितली. तसेच शेजारच्या साईराज इमारतीतील एका युवकाने गॅलरीत बांधून ठेवलेल्या सागर यांना पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांकडून कसून तपास

१) घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांनी मागील बाजूने पळ काढल्याने आणि त्या भागात सीसीटीव्ही नसल्याने तपासात आव्हाने निर्माण झाली आहेत.
२) लिफ्टनजीकच्या कॅमेऱ्यात त्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत, मात्र त्या अस्पष्ट आहेत. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी वास्को, मुरगाव, वेर्णा आणि मडगाव येथील पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.
३) श्वान पथक आणि न्यायवैद्यक पथकानेही घटनास्थळी पाहणी केली, अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी दिली.

आमदारांकडून विचारपूस

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, नगरसेविका शमी साळकर, नगरसेवक दीपक नाईक यांनी नायक कुटुंबाची भेट घेतली. तर वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी इस्पितळात जाऊन जखमी सागर नायक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भागात गस्त वाढवण्याचे निर्देश साळकर यांनी दिले.

हेही वाचा