५६ व्या 'इफ्फी'चे उद्घाटन सुपरस्टार सुपरस्टार रामचरण यांच्या हस्ते

समारोपाला ज्येष्ठ अभिनेते आमिर खान यांची उपस्थिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th November, 11:01 pm
५६ व्या 'इफ्फी'चे उद्घाटन सुपरस्टार सुपरस्टार रामचरण यांच्या हस्ते

पणजी : राज्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण यांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या महोत्सवाचा हा दिमाखदार उद्घाटन सोहळा पणजीतील जुन्या गोमेकॉ समोरील खुल्या आवारात पार पडणार आहे.

चित्ररथांची भव्य मिरवणूक

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे चित्ररथांची मिरवणूक असणार आहे. एकूण २३ चित्ररथ यात सहभागी असतील. यामध्ये गोमंतकीय कलाकारांचे आणि गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे ११ चित्ररथ असतील. तसेच, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) १२ चित्ररथ असून ते चित्रपट विषयांवर आधारित असतील.

८४ देशांचे २७० चित्रपट

यंदाच्या महोत्सवात १२७ देशांमधून आलेल्या प्रवेशिकांपैकी ८४ देशांचे २७० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवाची सुरुवात ‘दी ब्ल्यू ट्रेल’ या ब्राझिलियन चित्रपटाने होणार आहे. याशिवाय, चित्रपट रसिकांना पर्वरीतील आयनॉक्स, मडगाव येथील रवींद्र भवन आणि मीरामार समुद्रकिनाऱ्यावरील खुल्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

समारोप सोहळ्याला आमिर खान

महोत्सवाच्या समारोप सोहळ्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते आमिर खान उपस्थित राहणार आहेत. गोव्यात २००४ मध्ये इफ्फी सुरू झाली, तेव्हा आमिर खान उपस्थित होते. त्यानंतर आता २१ वर्षांनी, २०२५ च्या इफ्फीसाठी ते पुन्हा गोव्यात येत आहेत.

हेही वाचा