५०वी कोकणी नाट्य स्पर्धा : युगांकने नाकारला पुरस्कार

पणजी : कला अकादमीच्या ५० व्या कोकणी नाट्य स्पर्धेच्या लेखन विभागात परीक्षकांनी पहिले पारितोषिक घोषित न केल्याने वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून लेखक युगांक नायक यांनी त्यांना जाहीर झालेले दुसरे पारितोषिक स्वीकारण्यास नकार दिला.
सोमवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, लेखन विभागात परीक्षकांनी पहिल्या क्रमांकास कोणीही पात्र नसल्याचे कारण देत पहिले पारितोषिक रोखून धरले आणि केवळ दुसऱ्या क्रमांकाची घोषणा केली. निकाल जाहीर होताच, दुसऱ्या दिवशी युगांक नायक यांनी या निर्णयावर गंभीर आक्षेप घेतला.
कला अकादमी ही कलात्मक मापदंड निश्चित करणारी संस्था असल्याने या निकालाला शैक्षणिक महत्त्व आहे. नाट्यसंहिता किंवा लेखन विभागात पहिले पारितोषिक न देता थेट दुसरा पुरस्कार देणे हे सामान्य शहाणपणाच्या तत्त्वाविरोधी असून, यामुळे कलाकृती आणि तिच्या अभिव्यक्तीचा अवमान होतो. अकादमीच्या नियमावलीत असा कोणताही नियम अस्तित्वात नाही, असे नायक यांनी स्पष्ट केले.
पूर्वीही ‘ए’ गटात आणि कोकणी स्पर्धेत परीक्षकांनी पहिल्या पारितोषिकापासून दूर राहणे पसंत केले आहे. ५०-६० वर्षांपूर्वीची जुनी नियमावली आजही वापरली जाते. अपेक्षित गुणवत्ता साध्य झाली नाही तर पहिले बक्षीस दिले जात नाही, हा निर्णय परीक्षकांचा असतो. नियम जुने असल्याने चुकीचे निर्णय होतात आणि त्याचा ठपका परीक्षकांवर येतो, असे मत ज्येष्ठ नाट्यकर्मी जवाहर बर्वे यांनी मांडले.
स्पर्धेत काही चांगले प्रयोग झाले, याचा अर्थ त्यामागील लेखनही चांगले असणे अपेक्षित आहे. त्यामुळे ५० वर्षांच्या या स्पर्धेची गंभीरता ओळखून परीक्षकांनी पहिले बक्षीस द्यायला हवे होते. आता नियमावलीवर चर्चा करून फायदा नसून, कला अकादमी व इतर संस्थांनी पुढाकार घेऊन कलाकारांच्या अडचणी समजून घेत सुधारणा सुचवायला हव्यात, असे लेखक वसंत सावंत यांनी सांगितले.