सांख्यिकी खात्याचा अहवाल

पणजी: राज्यात ३१ मार्च २०१९ ते ३१ मार्च २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत ख्रिस्ती धर्मीय सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या २.३२ टक्क्यांनी कमी झाली आहे. याचदरम्यान हिंदू कर्मचाऱ्यांची संख्या २.१४ टक्क्यांनी, तर मुस्लिम कर्मचाऱ्यांची संख्या ०.०९ टक्क्यांनी वाढली आहे. या तीन धर्मांव्यतिरिक्त अन्य धर्मीय कर्मचाऱ्यांची संख्या पाच वर्षांत ०.१२ टक्क्यांनी वाढल्याची माहिती सांख्यिकी खात्याच्या अहवालातून मिळाली आहे.
या अहवालात सरकारी खाती, स्वायत्त संस्था, अनुदानित संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. या कालावधीत राज्यातील एकूण सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येत १.२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३१ मार्च २०१९ अखेरीस राज्यात एकूण ६३ हजार १६२ सरकारी कर्मचारी होते. यात ५० हजार ४३१ हिंदू (७९.९४ टक्के), ११ हजार ३३६ ख्रिस्ती (१७.९४ टक्के), १,४३४ मुस्लिम (२.२७ टक्के) तर ९० कर्मचारी (०.०२ टक्के) हे अन्य धर्मीय होते.
नवीन अहवालानुसार ३१ मार्च २०२४ अखेरीस राज्यात एकूण ६३ हजार ९७० सरकारी कर्मचारी होते. यात ५२ हजार ४४९ हिंदू (८१.९८ टक्के), ९ हजार ९९७ ख्रिस्ती (१५.६२ टक्के), १,३७७ मुस्लिम (२.१८ टक्के) तर १३७ कर्मचारी (०.१४ टक्के) हे अन्य धर्मीय होते. शैक्षणिक पात्रतेनुसार पाहता याच कालावधीत उच्चशिक्षित सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येत १.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा त्यापुढील शिक्षण घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांमधील विवाहित जोडप्यांची स्थिती
अहवालानुसार, ३१ मार्च २०२४ अखेरीस एकूण सरकारी कर्मचाऱ्यांपैकी ८,९१४ (१३.९३ टक्के) कर्मचारी हे नवरा-बायको (पती-पत्नी) आहेत. ३१ मार्च २०१९ अखेरीस हीच संख्या ९,७३६ (१५.४१ टक्के) होती.