जैवविविधता मंडळाचा इशारा : प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात

पणजी : गोव्यात सातत्याने वाढणारे तापमान आणि पिण्याच्या शुद्ध पाण्याची कमतरता यामुळे भविष्यात आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. विशेषतः डायरिया आणि उष्माघातासारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असून, प्रदूषण रोखण्यात अपयश आल्यास परिस्थिती अधिक बिकट होईल, असा गंभीर इशारा गोवा जैवविविधता मंडळाने आपल्या अहवालात दिला आहे.
गोवा जैवविविधता कृती आराखड्याचा भाग म्हणून डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी हे विश्लेषण केले आहे. त्यांनी ‘संसर्गजन्य आजार, जैवविविधता आणि प्राणीजन्य संसर्ग’ या विषयावर मांडलेल्या माहितीनुसार, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, केएफडी (मंकी फिव्हर), इन्फ्लुएंझा, कोविड-१९ आणि लेप्टोस्पायरोसिस यांसारखे आजार थेट हवामान आणि पर्यावरणातील बदलांशी संबंधित आहेत. आरोग्य सेवेच्या ‘एकात्मिक आजार निरीक्षण उपक्रमा’अंतर्गत (आयडीएसपी) या आजारांवर सतत देखरेख ठेवली जात आहे.