प्रथमदर्शनी पुरावे सिद्ध; न्यायालयाने फेटाळला संशयिताचा दोषमुक्ती अर्ज

पणजी: अमली पदार्थ कायद्यानुसार जप्त केलेली वस्तू 'गांजा'च्या व्याख्येत बसत आहे, तसेच प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध आहेत, असे निरीक्षण नोंदवत मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित सिसीरा नायक (२३, ओडिशा) या युवकाविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला आहे. याबाबतचा आदेश न्या. आरतीकुमारी नाईक यांनी दिला.
या प्रकरणी हणजूण पोलिसांनी ३० जानेवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, हणजूण येथील गोवा पर्यटन विकास मंडळाच्या पार्किंग परिसरात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. उपनिरीक्षक आशिष परब यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.१५ ते ७.१५ दरम्यान सदर ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या ठिकाणी एक युवक संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आला.
पथकाने त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडे पोलिसांना ५ लाख रुपये किमतीचा ५ किलो गांजा सापडला, जो पथकाने जप्त केला. अधिक चौकशीत त्याने आपले नाव सिसीरा नायक असल्याचे सांगितले. त्यानंतर उपनिरीक्षक आशिष परब यांनी नायक याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या वेळी संशयित नायक याने न्यायालयात अर्ज दाखल करून त्याला बनावट गुन्ह्यात अटक केल्याचा आणि तो निर्दोष असल्यामुळे त्याला आरोपातून मुक्त करण्याची मागणी केली.
या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, सरकारी अभियोक्ता कोलमन रॉड्रिग्ज यांनी बाजू मांडली. त्यांनी संशयिताकडून ५ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, पोलिसांनी जप्तीची प्रक्रिया योग्यरित्या केली असल्याचे स्पष्ट केले. तसेच, प्रथमदर्शनी सदर अमली पदार्थ गांजा असल्याचे आणि तो कायद्यातील 'गांजा'च्या व्याख्येत बसत असल्याचा प्रभावी युक्तिवाद केला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवले आणि संशयित सिसीरा नायक या युवकाविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला.