खासगी जमिनीवर अतिक्रमणाचा विरोधकांकडून आरोप

पणजी: कासावली येथे रेल्वे दुपदरीकरणाच्या कामावरून आज मोठा वाद निर्माण होऊन वातावरण तापले. खासगी जमिनीवर अतिक्रमण करून रेल्वे दुपदरीकरणाचे काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी करत हे काम थांबवले. कासावली येथे आज रविवार, २३ नोव्हेंबर रोजी खासगी जमिनीवरील संरक्षक भिंत मशीनरीचा वापर करून तोडण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे.
या वादानंतर दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, आणि गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या नेत्यांनी कामगारांना काम बंद करण्याची सूचना केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, लोकांना अंधारात ठेवून रेल्वे दुपदरीकरण करण्याचा प्रयत्न यातून स्पष्ट होतो. जमीन संपादित करण्यापूर्वी कोणतीही सरकारी यंत्रणा काम सुरू करू शकत नाही. या प्रकाराविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर वेर्णा पोलीस स्थानकात या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली असल्याची माहिती दिली आणि हा विषय आपण संसदेत मांडणार असल्याचे आश्वासन दिले.
आमदार विजय सरदेसाई यांनी रेल्वेच्या दादागिरीवर कडक टीका केली. ते म्हणाले, जमीन संपादित करण्यापूर्वी खासगी जमिनीवर अतिक्रमण करून काम सुरू करणाऱ्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची गरज आहे. दुपदरीकरणाच्या कामामुळे रेल्वे दादागिरी करत आहे. दरम्यान, या प्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.