जुने गोवा पोलिसांची कामगिरी : १० दिवसांची कोठडी

याच ड्रॉवरमधून चोराने रोख रक्कम आणि दागिने केले लंपास.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : उबो दांडो - सांताक्रूझ येथील फ्लॅटमधून २५ लाखांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या लोकेश सुतार या महाराष्ट्रातील सराईत चोराला जुने गोवा पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयिताला १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
या प्रकरणी कुसूम चौहान यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, १४ रोजी सकाळी ११ ते ११.३० या वेळेत तक्रारदार मुलाला शाळेतून आणायला गेल्या होत्या. घरी परतल्या असता मुख्य दरवाजाची कडी तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात पाहिले असता कपाटातील १५ लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने मिळून २५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. या चोरीची माहिती त्यांनी पतीसह पोलिसांना दिली.

कुलूप फोडून याच घरात केली चोरी.
माहिती मिळताच जुने गोवाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संकेत पोकरे व इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चोराने चौहान यांच्या समोरील फ्लॅटही फोडल्याचे दिसून आले. मात्र त्या फ्लॅटमधून काहीच चोरीला गेले नाही. पोलिसांनी ठसे तज्ज्ञ तसेच श्वानपथकाची मदत घेऊन तपास सुरू केला. इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती दुचाकीवरून येऊन चोरी करून पळाल्याचे दिसले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी सुतारवर संशय व्यक्त केला. पोलीस उपनिरीक्षक संकेत पोकरे, काॅन्स्टेबल गौरेश नाईक, अमर गावस, हरिश्चंद्र साखळकर आणि अक्षय पेडणेकर यांचे पथक तपासासाठी गोव्याबाहेर रवाना करण्यात आले होते. पथकाने महाराष्ट्र आणि कर्नाटकात संशयित लोकेश सुतारचा शोध घेतला. मंगळवारी रात्री संशयित लोकेशला कर्नाटकातील कोठाळगी येथून ताब्यात घेऊन बुधवारी गोव्यात आणले. संशयित लोकेशला अटक करून दुपारी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले. न्या. गजानन हळर्णकर यांनी संशयिताला १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
दोन चोरी प्रकरणांतून सुतारची जामिनावर झाली होती सुटका
मूळ महाराष्ट्रातील आणि मेरशी परिसरात राहणारा लोकेश सुतार याचा गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकात सुमारे १०० हून अधिक चोरीत सहभाग असल्याचे समोर आले आहे. मात्र त्याच्याविरोधात २५ ते ३० गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी जुने गोवा पोलीस स्थानकात दाखल झालेल्या दोन चोरी प्रकरणांत सुतारचा सहभाग असल्यामुळे आॅक्टोबर २०२४ मध्ये त्याला अटक झाली होती. दोन्ही प्रकरणांत त्याची जामिनावर सुटका झाली होती.