सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स गलथानपणावर न्यायालयाचे बाेट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : संशयिताकडून कोकेन जप्त करण्यात आले नव्हते, दिल्ली विमानतळातील सीसीटीव्ही फुटेज किंवा तिच्या आणि इतर संशयितांमधील कॉल डिटेल रेकॉर्ड्स सादर करण्यात आले नाहीत. व्हॉट्सअॅप चॅट्सचा पंचनामा किंवा स्क्रीन शॉट नोंद केले नाहीत. कटकारस्थान सिद्ध करणारे प्राथमिक पुरावे नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या तपासातील उणिवा स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने ४३.२० कोटी रुपये कोकेन तस्करी प्रकरणातील संशयित रेश्मा वाडेकर हिला १ लाख रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. हा आदेश मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी दिला.
पोलिसांच्या गुन्हे शाखेने १४ एप्रिल २०२५ रोजी चिकोळणा बसस्थानक परिसरात छापा टाकून ४३.२० कोटी रुपये किमतीचे ४.३२ किलो कोकेन जप्त केले होते. या प्रकरणी पोलिसांनी निबू व्हिन्सेंट, रेश्मा वाडेकर आणि तिचा पती मंगेश यांना अटक केली होती. चौकशीत रेश्मा विदेशातून दिल्ली विमानतळमार्गे ड्रग्ज घेऊन आल्याचे समोर आले. तिला विदेशात पाठवण्यासाठी मदत करणारे गुजरातचे चिराग रमेशभाई डुधात आणि तारिरो ब्राइटमोर मंगवाना (झिम्बाब्वे) यांना अटक केली. न्यायालयाने मंगवाना याची जामिनावर सुटका केली.
या प्रकरणी गुन्हा शाखेने मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. संशयित रेश्माने जामीन अर्ज दाखल केला. अॅड. ए. गावकर यांनी रेश्मातर्फे बाजू मांडली. त्यांनी आरोपपत्राची दखल घेतली. संशयिताकडून कोकेन जप्त करण्यात आले नव्हते, दिल्ली विमानतळातील सीसीटीव्ही फुटेज किंवा तिच्या आणि इतर संशयितांमधील कॉल डिटेल रेकॉर्ड्स सादर केले नाहीत. व्हॉट्सअॅप चॅट्सचा पंचनामा किंवा स्क्रीन शॉट नोंद केले नाहीत. कटकारस्थान सिद्ध करणारे प्राथमिक पुरावे नाहीत, असा दावा करून रेश्माला जामीन मंजूर करण्याची मागणी केली. न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून रेश्माला १ लाख रुपयांची हमी, पाच दिवस सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान तपास अधिकाऱ्यासमोर हजेरी लावणे व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणातील संशयित निबू व्हिन्सेंट वगळता सर्व संशयितांची जामिनावर सुटका झाली आहे.
ईडीकडूनही संशयितांची चौकशी
आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग तसेच मनी लाँड्रिंगच्या संशयावरून ईडी गोवा विभागाने १९ आॅगस्ट रोजी चिकोळणा-बोगमोळो येथील वाडेकर आणि व्हिन्सेंट याच्या घरांवर छापा टाकून महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले होते. त्याच दिवशी ईडीने चिराग डुधात याच्या गुजरातमधील घरावर, तसेच मुंबई, दिल्ली, पश्चिम बंगाल, हरयाणा, झारखंड आणि उत्तर प्रदेश येथे छापे टाकले. ईडीने महत्त्वाच्या दस्तावेजांसह इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेस व इतर वस्तू जप्त केल्या. २१ आॅगस्ट रोजी ईडीने मंगवाना याला चौकशीसाठी बोलावले होते. सहकार्य करत नसल्यामुळे त्याला अटक केली. ईडीने वाडेकर दाम्पत्यासह इतर संशयिताची चौकशी केली.