मंगळवारची दुर्घटना : दिवसभर नदीत शोध घेऊनही पत्ता नाहीच

देवांशू बुडालेल्या नदीजवळ तपास करताना पोलीस.
प्रतिनिधी। गाेवन वार्ता
फोंडा : क्रिकेटचा सराव करण्यासाठी जातो असे कुटुंबियांना सांगून मंगळवारी नदीवर पोहण्यासाठी जाणे देवांशू चेंदवणकर (१५, धाडे-पिळये) याला महागात पडले. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. दुसऱ्याच्या हाताला झाडाची फांदी लागल्याने सुदैवाने तो बचावला. बुधवारी पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी नदीत शोधमोहीम राबवली. अंधारामुळे सायंकाळी उशिरा शोधमोहीम थांबवावी लागली. देवांशूचा मात्र पत्ता लागला नाही.
फोंड्यातील एका शाळेत शिकणारे देवांशू आणि त्याचे चार मित्र क्रिकेटची प्रॅक्टिस करण्याचे कारण सांगून मंगळवारी घरातून बाहेर पडले होते. मात्र मैदानावर न जाता या पाचही जणांनी मौजमजा करण्याचे ठरवले. सुरुवातीला शांतिनगर येथील एका पिझ्झा सेंटरमध्ये सर्वांनी पिझ्झावर ताव मारला. त्यानंतर ते थेट धड्यार धारबांदोडा येथील नदीवर गेले. तेथे त्यांचे पोहणे चालू असतानाच दोन मुले बुडू लागली. पैकी एकाच्या हाताला झाडाची फांदी लागली. त्याच्या तीन मित्रांनी लगेचच त्याला तिथून बाहेर काढले. मात्र देवांशूला पाण्यातून बाहेर काढणे त्यांना जमले नाही. या प्रकारानंतर भयभीत झालेल्या मुलांनी घरी येऊन कुणाला काहीच सांगितले नाही. परिणामी मुलगा बुडाल्याची कुणालाच कल्पना नाही.

देवांशू चेंदवणकर
बुडाल्याचे समजताच पोलिसांनी नदीवर धाव घेतली. रात्री नदीवर धुके असल्याने त्या मुलाचा थांगपत्ता लागू शकला नाही. बुधवारी सकाळी फोंडा पोलिसांनी नदी ठिकाणी जाऊन शोधमोहीम हाती घेतली. या कामी फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम राबवूनही देवांशूचा पत्ता लागला नाही. अंधारामुळे शोधमोहीम थांबवावी लागली. गुरुवारी सकाळी पुन्हा पोलीस आणि अग्निशामक दलाकडून शोधमोहीम हाती घेतली जाणार आहे.