दक्षिण आफ्रिकेकडून ४०८ धावांनी मात : मालिकेवर २-०ने कब्जा

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेने तब्बल ४०८ धावांची जिंकत २- ० अशी मालिका खिशात घातली. भारताचा हा कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा धावांच्या बाबतीतला सर्वात मोठा पराभव ठरला. भारतासमोर विजयासाठी ५४९ धावांचे आव्हान होते. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघ १४० धावांपर्यंतच मजल मारू शकला.
भारताला व्हाईट वॉश देत दक्षिण अफ्रिकेने भारतात तब्बल २५ वर्षानंतर कसोटी मालिका जिंकली. याचबरोबर भारताचा हा सेना (सेना) देशांविरूद्धचा मायदेशातील सलग पाचवा पराभव ठरला. यापूर्वी न्यूझीलंडने भारताला मायदेशात ३-० अशी मात दिली होती.
गुवाहाटी येथे खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ धावांचा डोंगर उभारला होता. यानंतर त्यांनी टीम इंडियाचा पहिला डाव २०१ धावात गुंडाळला. दक्षिण अफ्रिकेने भारताला फॉलो ऑन न देता २६० धावा करत आपला डाव घोषित केला. यामुळे भारतासमोर विजयासाठी ५४९ धावांचे मोठे आव्हान उभे होते. सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाची अवस्था २ बाद २७ अशी झाली होती. त्यानंतर पाचव्या दिवशी टीमचा टिकाव लागेल याची शक्यता फार नव्हतीच. पाचव्या दिवशी सिमॉन हार्मेरच्या भेदक माऱ्यासमोर उरल्या सुरल्या टीम इंडियाने देखील नांगी टाकली. त्याने २३ षटकात ३७ धावा देत सहा विकेट्स घेतल्या. भारताकडून दुसऱ्या डावात रविंद्र जडेजाने ५४ धावा करत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र केशव महाराजने त्याची ही झुंज संपवली. महाराजने दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या. २०२५/२६ च्या दक्षिण आफ्रिका मालिकेतील दोन सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांची सरासरी १५.२३ होती. भारतीय संघाची कसोटी मालिकेतील ही दुसरी सर्वात कमी फलंदाजीची सरासरी आहे. यापूर्वी, २००२/०३ च्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताची सरासरी १२.४२ इतकी कमी होती.
घरच्या मैदानावर भारताला 'व्हाईटवॉश'
०-२ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०००
०-३ विरुद्ध न्यूझीलंड, २०२४
०-२ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०२५
भारतीय फलंदाजांनी एकही शतक न केलेल्या मालिका
विरुद्ध न्यूझीलंड, १९६९/७०
विरुद्ध न्यूझीलंड, १९९५/९६
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०२५/२६
टेम्बा बावुमाचा विश्वविक्रम
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक असाधारण आणि अनोखा विश्वविक्रम रचला आहे.आपल्या कारकिर्दीतील पहिले १२ कसोटी सामने अजिंक्य राहणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज लिंडसे हॅसेट यांच्या नावावर होता. या दोघांनीही त्यांच्या पहिल्या १२ कसोटी सामन्यांमध्ये १० विजय नोंदवले होते, पण बावुमाने आता ११ विजयांची नोंद करत त्यांना मागे टाकले आहे आणि नवा बेंचमार्क सेट केला आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानच्या कसोटी दौऱ्यावर गेला होता, तेव्हा दुखापतीमुळे टेम्बा बावुमा या मालिकेत खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत एडन मार्करामने संघाचे नेतृत्व केले आणि त्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, बावुमाने कर्णधार म्हणून पुनरागमन करताच, त्याने संघाला पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर आणले.
२५ वर्षांनी जिंकली मालिका
भारतामध्ये कसोटी सामना जिंकणे कोणत्याही विदेशी संघासाठी मोठे आव्हान असते. पण बावुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकेच्या संघाने यावेळी तर भारतीय संघाचा सूपडा साफ केला आहे. या विजयामुळे त्यांनी सन २००० साली झालेल्या कसोटी मालिकेची आठवण ताजी केली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत दारुण पराभव दिला होता. जवळपास २५ वर्षांपूर्वीचा इतिहास टेम्बा बावुमाने मोठ्या दिमाखात पुन्हा एकदा साकारला आहे. यापुढे टेम्बा बावुमाचा हा 'विजयरथ' असाच किती दिवस धडाक्यात सुरू राहतो, हे पाहणे क्रिकेट रसिकांसाठी निश्चितच खूप मनोरंजक असणार आहे.
प्रशिक्षक गौतम गंभीर टीकेचा धनी
भारतीय संघाच्या पराभवानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये गौतम गंभीर आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल असल्याचे दिसून येत आहे. तर स्ँटड्समधून प्रेक्षक गंभीर विरोधात घोषणाबाजी करताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक गौतम गंभीर हाय- हाय… अशा घोषणा देताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. सामना झाल्यानंतर,गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत सांगितले की, माझ्या भविष्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. मी जेव्हा मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला, तेव्हाच पत्रकार परिषदेत म्हटले होते, भारतीय क्रिकेट महत्त्वाचे आहे, मी नाही. आणि आजही मी इथे बसून अगदी तेच सांगतो.भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या गुणतालिकेवरही परिणाम झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारताला मोठा धक्का बसला असून डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत पाकिस्तान संघ भारताच्या पुढे गेला आहे.
मायदेशात भारताचा आणखी एका मानहानीकारक पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ५४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दक्षिण आफ्रिका संघाने दुसऱ्या डावात भारताला १४० धावांवर गुंडाळले आणि ४०८ धावांनी मोठा विजय मिळवला. एकूणच कसोटी क्रिकेटमध्ये आणि घरच्या मैदानावर धावांच्या फरकाने हा भारताचा सर्वात मोठा पराभव आहे. महत्त्वाचे म्हणजे १३ महिन्यांत भारताने घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये, न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा ३-० असा पराभव केला होता. हा पराभव जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीनेही लाजिरवाणा आहे, कारण त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशा धोक्यात येतील.
भारताचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेने डब्ल्यूटीसी गुणतालिकेच्या अव्वल दोनमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. दक्षिण आफ्रिका संघाने सध्या सुरू असलेल्या डब्ल्यूटीसी चक्रात चार कसोटी सामने खेळले असून तीन जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे सध्या ३६ गुण आहेत आणि ७५ टक्केवारीसह ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ ४८ गुण आणि १०० टक्केवारीसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांवर आहे. श्रीलंका संघ ६६.६७ टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तान संघ गुणतालिकेत पुढे गेला आहे. कारण भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या ९ कसोटी सामन्यांपैकी चार सामने गमावले आहेत, तर तेवढ्यात सामन्यात विजय मिळवला आहे, तर एक सामना अनिर्णित राखला आहे. त्यामुळे भारतीय संघ ५० गुण आणि ४८.१५ टक्केवारीसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. तर पाकिस्तान संघ दोन सामन्यांत एक विजय आणि एका पराभवासह १२ गुण आणि ५० च्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.