काँग्रेसच्या जागांवर आरजीचा दावा; आघाडीचा निर्णय आज शक्य

बोलणी सुरूच : पेच सोडविण्यासाठी वरिष्ठांचे कसब पणाला


4 hours ago
काँग्रेसच्या जागांवर आरजीचा दावा; आघाडीचा निर्णय आज शक्य

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ज्या मतदारसंघांत विजय मिळवला आहे, त्या मतदारसंघांतील काही जागांवर रिव्हॉल्युशनरी गोवन्सने (आरजी) दावा केला आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत निवडणुकीत आघाडी करण्याची बोलणी थांबली आहेत. काँग्रेसने मंगळवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी आघाडीविषयी मित्रपक्षांशी बोलणी सुरूच राहणार आहेत. गुरुवारी आघाडीविषयीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.
भाजपविरोधातील मतांंची विभागणी होऊ नये म्हणून आघाडी व्हावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळेच आम्ही आरजी आणि गोवा फॉरवर्ड पक्षासोबत चर्चा करत आहोत. ही चर्चा सुरू असतानाच आरजीने काँग्रेसवर विश्वासघाताचा आरोप केला. काँग्रेसने कोणत्याच पक्षाचा विश्वासघात केलेला नाही. आघाडीविषयी चर्चा सुरू असताना कार्यकर्त्यांच्या मतांंनाही मान द्यावा लागतो. त्यांची मते विचारात घ्यावी लागतात. जवळजवळ सर्व मतदारसंघांंत काँग्रेसचे उमेदवार तयार आहेत. इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. ज्या मतदारसंंघांत काँग्रेसची ताकत आहे, त्या मतदारसंघांतील उमेदवार पक्षाने जाहीर केले आहेत. आणखी बरेच उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी आघाडीचा पर्याय अद्यापही खुला आहे, असे प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी स्पष्ट केले.
मागील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला ११ मतदारसंघांत विजय मिळाला होता. मडगाव, नुवे, कुंकळ्ळी, केपे, कुंभारजुवे, सांंताक्रूझ, कळंगूट, शिवोली, साळगाव, हळदोणा आणि मुरगाव येथे काँग्रेसने विजयीध्वज फडकवला होता. याशिवाय कुडचडे, साखळी मतदारसंंघांत काँग्रेस चांगली मते मिळाली होती. या मतदारसंंघांतील जिल्हा पंचायत मतदारसंंघांवर काँग्रेसचा दावा आहे. ज्या मतदारसंघांत काँग्रेसचा प्रभाव मर्यादित आहे, त्या जागा मित्रपक्षांना द्यायला काँग्रेस तयार आहे. आघाडीची बोलणी सुरू असल्यामुळे उमेदवारांची घोषणा होण्यासाठी विलंब झाला, असेही पाटकर यांनी सांगितले.
राज्यात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजी आणि ‘आप’ हे चार विरोधी पक्ष आहेत. यापैकी आपने यापूर्वीच उमेदवारांची घोषणा करून ‘एकला चलो रे’ नारा दिला आहे. आघाडीबाबत गोवा फॉरवर्ड, काँग्रेस आणि आरजी यांची चर्चा सुरू आहे. २० डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा सुरू केली आहे.
भाजपला हरवण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी गरजेची
काँग्रेस हा जुना आणि राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहे. प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पारंंपरिक मते आहेत. तरीही भाजपला हरवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीत आघाडीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय झाला आहे. गुरुवारी आघाडीबाबत बैठकीत निर्णय होईल, असेही पाटकर म्हणाले.

काँग्रेससोबतची आघाडी कायम : विजय सरदेसाई
काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांची पूर्वीपासूनच आघाडी आहे. ही आघाडी जिल्हा पंचायत निवडणुकीतही कायम राहणार आहे. काँग्रेसला ३०, गोवा फॉरवर्डला १० आणि आरजीला १० जागा देण्याचा फॉर्म्युला यापूर्वी बैठकीत ठरला होता, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.


आज होणार आघाडीचा निर्णय : मनोज परब
जिल्हा पंचायत निवडणुकीत आघाडीविषयी बोलणी सुरू असतानाच आम्हाला अंधारात ठेवून काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेसने आमचा विश्वासघात केला आहे. गुरुवारी आघाडीबाबत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आरजी प्रमुख मनोज परब यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा