उत्तर गोव्यातून १५९, तर दक्षिण गोव्यातून १६८ उमेदवार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात २० डिसेंबर रोजी जिल्हा पंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली. या मुदतीत उत्तर गोवा जिल्ह्यातील २५ मतदारसंघांतून १५९, तर दक्षिण गोवा जिल्ह्यातील २५ मतदारसंघांतून १६८, असे एकूण ३२७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पक्षीय चिन्हावर होत असलेल्या या निवडणुकीत भाजप आणि मगोची युती आहे. काँग्रेस आणि गाेवा फॉरवर्ड यांनी आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्ष (आप) आणि रिव्हॉल्युुशनरी गोवन्स (आरजी) स्वबळावर मैदानात उतरले आहेत. अपक्षांनीही मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत.
राज्यातील सर्वाधिक ३८ मतदारसंघांतून भाजपने उमेदवार उभे केले आहेत. यात उत्तर गोव्यातील २४, तर दक्षिण गोव्यातील १४ मतदारसंघांचा समावेश आहे. मगो उत्तरेतून १ आणि दक्षिणेतून २, अशा एकूण ३ जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने उत्तरेतून १९ आणि दक्षिणेतून १६, अशा एकूण ३५ मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाने उत्तरेत ५, दक्षिणेत ४, असे ९ उमेदवार उभे केले आहेत. आम आदमी पक्षाने सर्वाधिक ४१ मतदारसंघांतून उमेदवार उतरवले आहेत. यात उत्तर गोव्यातील २१, तर दक्षिण गोव्यातील २० मतदारसंघांचा समावेश आहे. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजी) उत्तरेतून १७ आणि दक्षिणेतून ११, अशा एकूण २८ मतदारसंघांत लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) ३ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. अपक्षांची संख्याही मोठी आहे. उत्तरेतून २८ आणि दक्षिणेतून ४८ अशा एकूण ७६ अपक्षांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १ ते ९ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. बुधवार, १० रोजी अर्जांची छाननी होणार असून, गुरुवार, ११ रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
सर्वाधिक अर्ज धारगळमधून
उत्तर गोवा जिल्ह्यातील धारगळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून सर्वाधिक १२, तर त्यानंतर दक्षिणेतील पैंगीण मतदारसंघातून ११ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर्वांत कमी उमेदवार पाळे मतदारसंघात आहेत. येथे भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे.