अमित पाटकर, विजय सरदेसाई यांच्यामुळे युती झाली नाही : मनोज परब

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
अमित पाटकर, विजय सरदेसाई यांच्यामुळे युती झाली नाही : मनोज परब

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत (Zilla Panchayat Election) युती व्हावी यासाठी आरजीपीने (RGP) शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress Party President) अमित पाटकर आणि गोवा फॉरवर्डचे (Goa Forward Party)  विजय सरदेसाई यांना ही युती नको होती. 

दोघांचा २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधील फुटीरांना आडमार्गाने परत आणून त्यांना भाजपला विकण्याचा मास्टरप्लॅन आहे असा सनसनाटी आरोप आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी केला. बुधवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते. 

परब यांनी सांगितले की, निवडणुकीत भाजपला फायदा होऊ नये; यासाठी आम्ही युती करण्याबाबत आग्रही होतो. यासाठी आम्ही गोवा फॉरवर्ड सोबत जागावाटपाची चर्चा करून मग काँग्रेस सोबत बोलणी केली. युती व्हावी यासाठी आम्ही आमचे मतदान अधिक असणाऱ्या जागा देखील सोडण्याचा निर्णय घेतला. जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होत असतानाच गोवा फॉरवर्डने काणकोणमधील फुटीर इजिदोर फर्नांडिस यांना पक्षात घेतले.

याला आम्ही आक्षेप घेतला. लोकांना फसवलेल्या व्यक्तीला युतीमधील पक्षात घेतल्यास याचा परिणाम आरजीवर होणार असे देखील आम्ही सांगितले. याबाबत आम्ही गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आम्हाला भेटले नाहीत. यानंतर आम्ही काँग्रेसशी संपर्क केला असता; त्यांनी देखील ही भूमिका मान्य नसल्याचे सांगितले.

काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता. ठाकरे यांनी तेव्हा फुटीरांना कसलीही संधी देणार नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे निवडणुकीत काँग्रेस ३७ तर आरजीपी १३ जागा लढवणार असे जवळपास निश्चित झाले होते. 

मात्र, गोवा फॉरवर्डने अचानकपणे शिरोडा, खोर्ली या जागांवर दावा केला. याआधी त्यांनी आपल्याला या जागा नको असल्याचे सांगितले होते. गोवा फॉरवर्ड आपले उमेदवार उभे करून भाजपला मदत करत आहे. अमित पाटकर आणि विजय सरदेसाई हे दोघे भाजपच्या आदेशाने आरजीपी संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. विजय यांना आरजीपीचा वापर करून गोवा फॉरवर्डला मजबूत तर काँग्रेसला कमजोर करायचे असल्याचा आरोप परब यांनी केला.

दिल्लीला गेलोच नव्हतो

परब यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्यात आम्ही दिल्लीला जाऊन आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आम्ही दिल्लीला गेलोच नव्हतो. आम्ही दोन वर्षांपूर्वीचा जुना फोटो अपलोड केला होता. याबाबत आम्ही विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना देखील सांगितले होते. आम्हाला केवळ प्रतिक्रिया पाहायच्या होत्या.




हेही वाचा