
पणजी : गोव्यातील (Goa) हडफडे येथील नाइट क्लबला (Night Club) लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत २५ जणांचा बळी गेल्यानंतर राज्यात सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय ऐरणीवर आले आहेत. बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. काब द राम (Cabo de Rana), खोला, काणकोण (Canacona) येथे शॅकचा परवाना घेऊन सुरू असलेल्या ‘द केप गोवा’ (The Cape Goa) रेस्टॉरंटला कार्यकारी दंडाधिकारी तथा संयुक्त अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षा माया पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कारवाई करीत सील ठोकले. संयुक्त समितीने केलेल्या तपासणीत याठिकाणी अनेक अटींचे उल्लंघन आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अनेक प्रकारच्या नियमांचे उल्लंघन
‘द केप गोवा’ रेस्टॉरंट’च्या लहानशा जागेत २४ जण गर्दी करून बसले होते. मालक बांधकामासंदर्भातील स्ट्रक्चरल प्लॅन व स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट सादर करू शकले नाहीत. किचनमधील व्यवस्था असुरक्षित होती व बाहेर पडण्यासाठी आवश्यक जागा नव्हती. छोट्याशा जागेत २९ व्यावसायिक सिलिंडर धोकादायक स्थितीत ठेवण्यात आले होते. एलपीजी गॅस गळती डिटेक्टर बसवलेला नव्हता.
विजेचा एमसीबी बोर्ड उघडा व असुरक्षित होता. रेस्टॉरंटमध्ये अग्निशामक उपकरणे नव्हती. वीज वायरिंग धोकादायक स्थितीत होते. पर्यटन खात्याकडून खासगी शॅक चालवण्याचा परवाना घेऊन रेस्टॉरंट चालवण्यात येत होते. त्यात बार काउंटर, स्वयंपाकघर, पॅंट्री, बेकरी, सुमारे १२० कर्मचारी, स्टाफ मेस, १२० जण बसण्याची क्षमता असलेली ४० खुर्ची, टेबल इत्यादींचा समावेश होता.