बर्च दुर्घटनेचा विषय अधिवेशनातही तापणार : १२ जानेवारी ते १६ जानेवारीपर्यंत होणार अधिवेशन

१२ रोजी होणार राज्यपालांचे अभिभाषण : बर्च दुर्घटनेवर विरोधक करणार चर्चेची मागणी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
16th December, 03:47 pm
बर्च दुर्घटनेचा विषय अधिवेशनातही तापणार : १२ जानेवारी ते १६ जानेवारीपर्यंत होणार अधिवेशन

पणजी : बर्च बाय रोमिओ लेनला (Birch by Romeo Lane)  लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू होण्याच्या दुर्घटनेचा विषय गोवा विधानसभा अधिवेशनातही (Goa Assembly Session) तापणार आहे. या दुर्घटनेवर विरोधी पक्ष खास चर्चेची मागणी करणार असल्याची माहिती गोवा फॉरवर्डचे (Goa Forward Party) आमदार विजय सरदेसाई (Mla Vijay Sardesai) यांनी दिली. गोवा विधानसभेचे अधिवेशन १२ जानेवारी ते १६ जानेवारी, २०२६ असे पाच दिवस होणार आहे.

राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी अधिवेशनाचे समन्स जारी केले आहे. पहिल्याच दिवशी १२ रोजी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांचे अभिभाषण होईल. गोवा विधानसभेत अभिभाषण करण्याची राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची ही पहिलीच वेळ असेल. अधिवेशनाचा शेवटचा दिवस (शुक्रवार १६ जानेवारी) हा खासगी कामकाजाचा दिवस असेल.

बर्च बाय रोमिओ लेन दुर्घटनेला एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर हे अधिवेशन होणार आहे. या दुर्घटनेप्रकरणी गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने स्वेच्छा याचिकेव्दारे दखल घेतली आहे. मानवाधिकार आयोगानेही दुर्घटनेप्रकरणी सरकारला नोटीस जारी केली आहे. यानंतर आता अधिवेशनातही या दुर्घटनेवर वादळी चर्चा अपेक्षित आहे. नोकर भरती घोटाळा तसेच बर्च दुर्घटनेबाबत खास चर्चेची मागणी विरोधी पक्षांतर्फे केली जाईल. याबाबत विरोधी पक्षांची बैठक होऊन त्यात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विजय सरदेसाई यांनी दिली. 

आमदारांना २६ डिसेंबर, २०२५ पर्यंत प्रश्न सादर करावे लागतील. शून्य प्रहर व लक्षवेधी सूचनेसाठी त्याच दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत ऑनलाईन स्वरूपात नोटिस द्यावी लागेल. खासगी कामकाजाच्या दिवशी खासगी प्रस्ताव चर्चेला घेण्यासाठी १ जानेवारी, २०२६ पर्यंत नोटीस देणे आवश्यक आहे. अधिवेशनाचा सविस्तर कार्यक्रम कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरणार आहे. 





हेही वाचा