
पणजी : बर्च क्लबमधील (Birch by Romeo Lane Club) अग्नितांडव प्रकरणातील मुख्य संशयित व क्लबचे मालक सौरभ लुथरा (Saurabh Luthra) व गौरव लुथरा (Gaurav Luthra) यांना दिल्लीत गोवा पोलिसांनी (Goa Police) ताब्यात घेतले असून; लवकरच त्यांना गोव्यात आणले जाणार आहे. गोवा पोलिसांनी ही माहिती दिली.
थायलंड सरकारने (Thailand Government) संशयित लुथराबंधूंची हद्दपारीची प्रक्रीया रविवारी पूर्ण केली. यानंतर सोमवारी संशयितांचे भारतीय दूतावासाकडे हस्तांतरण करण्यात आले. लुथरा बंधूंना दिल्लीत ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक सोमवारीच दिल्लीला रवाना झाले होते. आज सकाळी दहाच्या सुमारास इंटरपोलचे पथक बँकॉकहून इंडिगोच्या विमानाने त्यांना दिल्लीत घेऊन आले. दिल्लीत पोचताच सोपस्कार पूर्ण करून गोवा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
मागील शनिवारी (६ डिसेंबर) रात्री हडफडे येथील बर्च बाय रोमिओ क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना घडली तेव्हाच क्लबचे मालक असलेले लुथरा बंधू थायलंडला पळून गेले होते. दोघेही थायलंडमध्ये (फुकेत) असल्याचा सुगावा लागल्यानंतर गोवा पोलिसांनी सीबीआयच्या मदतीने गोव्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. यासाठी ‘ब्ल्यू कॉर्नर’ नोटिसही जारी करण्यात आली. अखेर भारतात आणण्यासह त्यांना ताब्यात घेण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे.या प्रकरणी गोवा पोलिसांनी क्लबच्या व्यवस्थापकांसह सहा जणांना यापूर्वीच अटक केली आहे.