शहापूरचा हिरा ओंकार तारमळे आता सनरायझर्स हैदराबादच्या 'ऑरेंज आर्मी'मध्ये

शहापूर: जिद्द, चिकाटी आणि वडिलांच्या त्यागाची जाणीव यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या शहापूर तालुक्यातील शेरे गावच्या एका सामान्य कुटुंबातील तरुणाने गगनभरारी घेतली आहे. १६ डिसेंबर २०२६ रोजी झालेल्या आयपीएलच्या मिनी लिलावात महाराष्ट्राच्या ओंकार तारमळेला काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबाद संघाने ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. ही केवळ एका खेळाडूची निवड नसून, एका बापाने आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी घेतलेल्या कष्टांचे आणि संघर्षाचे गोड फळ आहे.

शहापूरच्या ग्रामीण भागातून आलेल्या ओंकारचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता. एकेकाळी हलाखीच्या परिस्थितीमुळे ओंकारने क्रिकेट सोडण्याचा विचारही केला होता, परंतु त्याने कुटुंबाकडे शेवटची एक संधी मागितली आणि स्वतःला सिद्ध करून दाखवले. ओंकारचे वडील तुकाराम तारमळे यांनी आपल्या मुलाच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी सावकाराकडून कर्ज काढले होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. पण मुलाचे स्वप्न त्यांनी कोमेजू दिले नाही. दिल्ली आणि त्रिपुरामध्ये खेळायला पाठवण्यासाठी त्यांनी ३ लाखांचे कर्ज घेतले. आज जेव्हा आयपीएलमध्ये मुलाचे नाव झळकले, तेव्हा वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुलाच्या निवडीची बातमी कळताच तुकाराम तारमळे यांनी खुर्चीवरून उड्या मारत देवाचे आभार मानले, तो भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे डोळे ओलावतोय.
ओंकारच्या या यशात त्याचे प्रशिक्षक नरेंद्र दिवाणे यांचा मोलाचा वाटा आहे. टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या ओंकारची उंची आणि गोलंदाजीची शैली पाहून दिवाणे यांनी त्याला हेरले होते. त्यांनीच ओंकारच्या वडिलांची समजूत काढून त्याला व्यावसायिक क्रिकेटकडे वळवले. गेल्या काही वर्षांत ओंकारने आपल्या फिटनेस, रनअप आणि ॲक्शनवर प्रचंड मेहनत घेतली. कुर्ल्यातील शेट्टी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्याने क्रिकेट आणि अभ्यासाचा सुरेख ताळमेळ साधला. मुंबई प्रीमियर लीग आणि पुरुषोत्तम शिल्डमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरल्यानंतर ओंकारचे नाव चर्चेत आले होते.
![]()
विशेष म्हणजे, ज्यावेळी कोट्यवधींच्या बोली लावून लिलाव सुरू होता, तेव्हा ओंकार टीव्हीसमोर न बसता शांतपणे गावातल्या मंदिरात प्रार्थना करत होता. जेव्हा सनरायझर्स हैदराबादने त्याच्यावर विश्वास दाखवला, तेव्हा त्याच्या कष्टांचे सार्थक झाले. निवड झाल्यानंतर ओंकारने आपल्या प्रशिक्षकांना फोन करून 'थँक्स' म्हटले, तेव्हा तो प्रचंड भावूक झाला होता. आता शहापूरचा हा सुपुत्र आयपीएलच्या मैदानात दिग्गज खेळाडूंसोबत सराव करण्यासाठी सज्ज झाला असून, हा त्याच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट मानला जात आहे. कोणत्याही मुलाचे एक स्वप्न असते, ते म्हणजे आपल्या वडिलांच्या डोळ्यात स्वतः बद्दल अभिमान दिसावा. वडिलांच्या डोळ्यात ते दिसते आहे, असे ओंकार भावनिक होऊन म्हणाला.
![]()