उत्तोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट' शॅकला आग; १० लाखांची हानी

मागील आठवड्यातच जिल्हा प्रशासनाने या शॅकचे बेकायदा बांधकाम हटवण्याचे दिले होते निर्देश.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
21st December, 04:07 pm
उत्तोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट' शॅकला आग; १० लाखांची हानी

मडगाव: उत्तोर्डा येथील 'जॅमिंग गोट' या प्रसिद्ध शॅकला रविवारी पहाटे भीषण आग लागली. वेर्णा आणि मडगाव अग्निशामक दलाने अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र या आगीत शॅकमधील साहित्याचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यातच जिल्हा प्रशासनाने या शॅकचे बेकायदा बांधकाम हटवण्याचे निर्देश दिले होते.



स्नेहा नरोन्हा यांच्या मालकीच्या या शॅकला रविवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच वेर्णा अग्निशामक दलाचे अधिकारी दिलेश गावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची व्याप्ती वाढल्याने मडगाव अग्निशामक दलाचा बंबही पाचारण करण्यात आला. या आगीत शॅकमधील टेबल, खुर्च्या, विद्युत वायरिंग आणि मद्याच्या साठ्यासह इतर साहित्य जळून खाक झाले. शॅकमध्ये गॅस सिलिंडरही होते, परंतु सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



अग्निशामक दलाने केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शॅकच्या बांधकामासाठी अग्निशामक दलाचा कोणताही परवाना घेण्यात आला नव्हता, तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. दरम्यान, 'गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा'ने केलेल्या पाहणीत या शॅकचे बांधकाम बेकायदा आढळले होते. त्यानुषंगाने दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने कारवाईचे निर्देश दिले असून, सोमवारी सकाळी हे बेकायदा बांधकाम पाडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा