
मडगाव: मुंगूल येथील गँगवॉर प्रकरणातील १३ संशयितांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर, आता या प्रकरणातील आणखी ११ संशयितांनी जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. या अर्जांवर दोन वेळा सुनावणी झाली असून, पुढील महत्त्वाची सुनावणी २३ डिसेंबर रोजी होणार आहे.
मुंगूल येथे १२ ऑगस्ट रोजी झालेल्या गँगवॉर प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी एकूण २८ संशयितांना अटक केली होती. यापूर्वी दोन संशयितांना जामीन मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र (Charge Sheet) दाखल केले. आरोपपत्राच्या प्रती सर्व संशयितांना मिळाल्यानंतर, व्हॅली डिकॉस्टा, अमर कुलाल, वासु कुमार, मोहन अली, ज्योयस्टन फर्नांडिस, सुनील बिलावर, बाशा शेख, गौरांग कोरगावकर, राजेश वेल्मा, प्रकाश वेल्मा, अविनाश गुंजीकर, धनंजय तलवार आणि अक्षय तलवार या १३ जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता. दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने या सर्वांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
आता अमोघ नाईक, मोहम्मद ताहीर खान, विल्सन कार्व्हालो, मलिक शेख, मंदार प्रभू, सुरज बोरकर, ओमप्रकाश मेघवाल, प्रकाश करबार, सुरज माझी, शाहरुख शेख आणि इम्रान बेपारी या उर्वरित ११ संशयितांनी १६ डिसेंबर रोजी जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. या ११ जणांच्या नशिबाचा फैसला आता २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत होणार आहे. या गँगवॉर प्रकरणामुळे मडगाव आणि परिसरात मोठी खळबळ उडाली होती.