जिल्हा पंचायत निकालांकडे गोव्याचे लक्ष; दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
21st December, 04:49 pm
जिल्हा पंचायत निकालांकडे गोव्याचे लक्ष; दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार

पणजी: गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी झालेली ७०.८१ टक्के विक्रमी मतदानाची आकडेवारी पाहता, उद्या होणाऱ्या निकालाबाबत संपूर्ण राज्यात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यातील १४ विविध केंद्रांवर उद्या सकाळी ८ वाजल्यापासून कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमेजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत सर्व जागांचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६० ते ६५ टक्क्यांवरून थेट ७० टक्क्यांच्या पार गेल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदानादरम्यान मतदारांमध्ये उत्साह दिसून आला असून, विशेषतः पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण अधिक राहिले आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांत महिला मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला हक्क बजावला असल्याने, महिलांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे दिसत आहे.

मतदानानंतर सर्व मतपेट्या संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात 'स्ट्रॉंग रूम'मध्ये ठेवण्यात आल्या होत्या.  सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. बार्देश, सासष्टी आणि फोंडा या मोठ्या तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन केंद्रांवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये नियोजित क्रीडा संकुल किंवा सरकारी कार्यालयांमध्ये ही प्रक्रिया पार पडेल.

निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा किंवा अपक्ष उमेदवारांचा वरचश्मा राहतो, यावर आगामी स्थानिक राजकारणाची दिशा ठरेल. सर्व केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात येईल. अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे.

मतमोजणी केंद्रांची ठिकाणे:

पेडणे: मल्टीपर्पज क्रीडा स्टेडियम

बार्देश: पेडे क्रीडा संकुल (बॉक्सिंग आणि बॅडमिंटन हॉल)

तिसवाडी: डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, ताळगाव

डिचोली : नारायण झाट्ये सभागृह, सर्वण

सत्तरी: कदंबा बस स्थानक हॉल, वाळपई

फोंडा: सरकारी आयटीआय सभागृह आणि वर्कशॉप, फर्मागुडी

सासष्टी: माथानी साल्ढाणा संकुल, मडगाव

धारबांदोडा: सरकारी कार्यालय संकुल, तामसोडो

सांगे: सरकारी क्रीडा संकुल

केपे: सरकारी क्रीडा संकुल, बोरीमळ

काणकोण: सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय

हेही वाचा