जिल्हा पंचायत निकाल : विरोधकांमधील बिघाडी भाजपच्या पथ्यावर!

अवघ्या मतांनी उमेदवार जिंकल्याने सत्ता राखण्यात जेमतेम यश

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
22nd December, 04:37 pm
जिल्हा पंचायत निकाल : विरोधकांमधील बिघाडी भाजपच्या पथ्यावर!

पणजी : विखुरलेल्या विरोधी मतांचा लाभ सत्ताधारी भाजप उमेदवारांना झाल्याने दोन्ही जिल्हा पंचायती (Zilla Panchayat) राखण्यात भाजपला (BJP) जेमतेम यश आले आहे. उत्तरेतील काही उमेदवार वगळले तर भाजपचे बहुतांशी उमेदवार कमी फरकाच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. मंत्री, आमदारांच्या मतदारसंघांकडे संबंधीत असलेले उमेदवार पराभूत झाल्याने भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे.

२०२७ मध्ये विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार आहे. विधानसभा निवडणुकीला एक वर्ष उरले असल्याने जिल्हा पंचायत निवडणूक ही एक प्रकारे सेमीफायनलच आहे. मागील २०२० च्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले होते. तसे यश यावेळी मिळालेले नाही. विरोधी उमेदवारांनी भाजप उमेदवारांना कडवी टक्कर देत घाम काढला. सर्व मतदारसंघांत बहुरंगी लढती झाल्याने मतविभाजनाचा लाभ भाजप उमेदवारांना झाला. विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपचा पराभव शक्य असल्याचा संदेश देणारा हा निकाल आहे. हरमलमध्ये अपक्ष राधिका पालयेकर यांनी भाजप उमेदवाराला धूळ चारली.

दक्षिण गोव्यात मागच्या पेक्षा यावेळी काँग्रेसीची कामगिरी चांगली झाली. नुवे, दवर्ली, गिरदोली, कुडतरी, नावेली या ख्रिस्ती समाजाचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघांत काँग्रेसला यश मिळाले आहे.

उत्तरेत हळदोणा मतदारसंघाच्या आधारे खाते उघडण्यात काँग्रेसला यश मिळाले असले तरी इतरत्र काँग्रेसची कामगिरी सुमार दर्जाची राहिली आहे. दक्षिण गोव्यात आप व गोवा फॉरवर्डला खाते उघडण्यात यश आले आहे. युती तुटण्यास कारण ठरलेली काँग्रेसची सांताक्रुझची जागा आरजीने हिसकावली आहे. सांताक्रुझ मतदारसंघात विजय मिळवून आरजीने जिल्हा पंचायतीत आपले अस्तित्व राखले आहे.

लाटंबार्से, होंडा, नगरगाव, केरी या मतदारसंघांत अधिक मतदान झाले होते. या मतदारसंघांत भाजपलाच यश मिळाले आहे. 

पक्षनिहाय विजयी उमेदवार

उत्तर गोवा :

भाजप : महेश्वर गोवेकर (शिवोली), फ्रँझिला रॉड्रिग्ज (कळंगुट), अमित अस्नोडकर (सुकूर), रघुवीर कुंकळ्येकर (ताळगाव), पद्माकर मळीक (लाटंबार्से), महेश सावंत (कारापूर सर्वण), नामदेव चारी (होंडा), निलेश परवार (केरी), प्रेमनाथ दळवी (नगरगाव), रेष्मा बांदोडकर (रेईश मागूश), कुंदा मांद्रेकर (मये), गौरी कामत (चिंबल)

मगो : तारा हडफडकर (मोरजी)

काँग्रेस : मॅरी मिनेझिस (हळदोणा)

अपक्ष : कविता कांदोळकर (कोलवाळ), राधिका पालयेकर (हरमल)

आरजी : इस्पेरँका ब्रागांझा (सांताक्रुझ)

दक्षिण गोवा :

भाजप : समीक्षा नाईक (उजगाव गांजे), पूनम सामंत (बोरी), मोहन गावकर (सावर्डे), रूपेश देसाई (धारबांदोडा), राजश्री गावकर (रिवण), सिद्धार्थ गांवस देसाई (शेल्डे), अंजली वेळीप (बार्से), सुनील गावस (सांकवाळ),प्रितेश गावकर (कुर्टी)

मगो : गणपत गावकर (कवळे), काँग्रेस : अँथनी ब्रागांझा (नुवे), फ्लोरियानो फर्नांडिस (दवर्ली), संजय वेळीप (गिरदोली), अॅस्ट्रा डिस‌िल्वा (कुडतरी), मालिफा कार्दोज (नावेली), सुमित्रा पागी (खोला),

गोवा फॉरवर्ड : इनासिना पिंटो (राय)

आप : आंतानियो फर्नांडिस (कोलवा)

अपक्ष : सुनील जल्मी (बेतकी खांडोळा), मर्सियाना वाझ (कुठ्ठाळी).




हेही वाचा