‘गोवन वार्ता’चे वृत्त ठरले खरे : ३१ डिसेंबरला होणार शपथविधी

पणजी : उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा रविवारी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली. उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी रेश्मा बांदोडकर आणि उपाध्यक्षपदी नामदेव च्यारी, तर दक्षिण गोवा अध्यक्षपदी सिद्धार्थ गावस देसाई आणि उपाध्यक्षपदी अंजली वेळीप यांची नावे निश्चित झाली. विशेष म्हणजे, ‘गोवन वार्ता’ने याबाबतचे वृत्त सर्वात आधी दिले होते.
| जिल्हा | पद | उमेदवार |
|---|---|---|
| उत्तर गोवा | अध्यक्ष | रेश्मा बांदोडकर |
| उत्तर गोवा | उपाध्यक्ष | नामदेव च्यारी |
| दक्षिण गोवा | अध्यक्ष | सिद्धार्थ गावस देसाई |
| दक्षिण गोवा | उपाध्यक्ष | अंजली वेळीप |
उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपद आणि दक्षिण गोवा उपाध्यक्षपद महिलांसाठी राखीव करण्यात आले होते. उत्तर गोव्यातून भाजप-मगो युतीच्या ५ महिला सदस्य निवडून आल्या. त्यापैकी रेईश-मागुश मतदारसंघातून निवडून आलेल्या रेश्मा बांदोडकर यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली. त्या माजी जिल्हा पंचायत सदस्य संदीप बांदोडकर यांच्या पत्नी असून त्यांनी यापूर्वी सरपंच तसेच पंच म्हणूनही काम पाहिले. हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्याने संदीप बांदोडकर यांच्या जागी पक्षाने रेश्मा यांना उमेदवारी दिली होती. तसेच उत्तर गोवा उपाध्यक्षपदी होंडा मतदारसंघातील नामदेव च्यारी यांचे नाव जाहीर करण्यात आले.
दक्षिण गोव्यातील शेल्डे मतदारसंघातील विद्यमान सदस्य सिद्धार्थ गावस देसाई हे दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून आले असून त्यांच्याकडे दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. तर दक्षिण गोव्यातून बार्से मतदारसंघातून निवडून आलेल्या अंजली वेळीप यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी पक्षाने जाहीर केले. उत्तर आणि दक्षिण दोन्ही जागी भाजपचाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असणार, असे वृत्त दोन्ही अध्यक्षांच्या नावासह ‘गोवन वार्ता’ने दिले होते, त्यावर आता शिक्कामोर्तब झाले.
एकापेक्षा अधिक अर्ज न आल्यास ३० डिसेंबर (मंगळवार) रोजी नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात येतील. त्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता पर्वरी येथील सचिवालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडेल. यासंदर्भात पंचायत संचालक महादेव आरोंदेकर यांनी सदस्यांना पत्राद्वारे कळवले आहे.