
म्हापसा : आसगाव येथे स्वयंअपघातात गंभीर जखमी झालेला आत्माराम जिवाजी बुगडे (२६, रा. धुळेर म्हापसा) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्य झाला. गतिरोधकावर दुचाकी उसळल्याने हा अपघात घडला होता.
रविवार, दि. २८ रोजी सकाळी ६.२५ वा. च्या सुमारास हा अपघात आसगाव पंचायत घर रस्त्यावर घडला होता. तर सोमवारी २९ रोजी पहाटे उपचारादरम्यान गोमेकॉत त्याचे निधन झाले. आत्माराम हा हणजूणहून आसगावमार्गे म्हापशाला येत होता. घटनास्थळी असलेल्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने त्याची (जीजे ०६ एफ ७७११) क्रमांकाची हार्ले डेव्हिडसन ही मोटारसायकल उसळली. अपघातग्रस्त दुचाकीने प्रथम रस्त्याच्या बाजूच्या एका घराच्या लोखंडी फाटकाला व नंतर संरक्षक भिंतीला धडक दिली. त्यानंतर आत्माराम हा रस्त्यावर कोसळला आणि गंभीर जखमी झाला. जखमीला प्रथम म्हापसा जिल्हा इस्पितळात व नंतर गोमेकॉत हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हणजूण पोलिसांनी पंचनामा करून त्याचा मृतदेह कुटूंबियांच्या स्वाधीन केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितेश शिंगाडी हे करीत आहेत.