गोमेकॉत २३ जागांसाठी भरती

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
गोमेकॉत २३ जागांसाठी भरती

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) विविध २३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या सर्व जागा एका वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. या पदांसाठी ८ जानेवारी २०२६ रोजी गोमेकॉतील डीन कार्यालयातील सभागृहात थेट मुलाखती (Walk-in Interview) होतील. इच्छुक उमेदवारांनी सकाळी ९:३० वाजता आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. याशिवाय, २६ जागा 'लिव्ह व्हेकन्सी' तत्त्वावर भरल्या जाणार आहेत.

कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या २३ जागांपैकी रक्तपेढीतील अधिकारी आणि ॲनाटॉमी विभागातील प्रशिक्षकांच्या प्रत्येकी ४ जागा आहेत. यासाठी उमेदवारांकडे आवश्यक वैद्यकीय पात्रता असणे अनिवार्य आहे. दोन्ही पदांसाठी मासिक ८० हजार रुपये वेतन असेल. सीव्हीटीएस (CVTS) आणि मेडिकल ऑन्कोलॉजी विभागात सहाय्यक प्राध्यापकाच्या प्रत्येकी दोन जागांवर भरती केली जाईल, तर पॅथॉलॉजी आणि ॲनाटॉमी विभागात ट्युटरची प्रत्येकी एक जागा भरली जाईल.

याशिवाय प्रसूतीशास्त्र, रेडिएशन, रेडिओलॉजी आणि क्लिनिकल सायकॉलॉजी विभागात व्याख्याता पदाच्या प्रत्येकी एका जागेसाठी भरती होईल. गोमेकॉच्या रक्तपेढीत नेत्रदान समुपदेशकांच्या २ जागा भरल्या जातील; यासाठी उमेदवाराकडे समाजशास्त्र विषयातील पदवी आणि दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. नेत्रपेढीमध्ये तंत्रज्ञांच्या दोन जागांसाठी उमेदवार विज्ञान विषयासह १२ वी उत्तीर्ण असावा.

'लिव्ह व्हेकन्सी' पद्धतीने स्टाफ नर्सच्या २४, तर कनिष्ठ तंत्रज्ञ आणि फिजिओथेरपिस्टची प्रत्येकी एक जागा भरली जाईल. कनिष्ठ तंत्रज्ञ पदासाठी उमेदवार बी.एससी. (मायक्रोबायोलॉजी किंवा रसायनशास्त्र) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्टाफ नर्स पदासाठी नर्सिंग प्रमाणपत्र, आया प्रमाणपत्र किंवा बी.एससी. नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नर्स पदांसाठी ९ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मुलाखती होतील.


हेही वाचा