तंत्रज्ञानाने टेकले हात; आता मनाची मिळेल का साथ ? एखादी गोष्ट विसरणे किती महागात पडू शकते याचे उदाहरण म्हणजे हे प्रकरण, वाचा सविस्तर

वॉशिंग्टन : डिजिटल युगातील प्रगती जितकी सुखावह आहे, तितकीच ती कधीकधी जीवघेणी ठरू शकते, याचा प्रत्यय अमेरिकेतील उद्योजक स्टेफन थॉमस यांच्या उदाहरणावरून येतो. आपल्या साध्या ईमेलचा पासवर्ड विसरलो तरी आपण अस्वस्थ होतो, मात्र स्टेफन थॉमस यांनी तब्बल ६,५०० कोटी रुपयांच्या संपत्तीचे ठोकताळे एका लॉकरमध्ये टाकले आणि चक्क त्याचा पासवर्ड विसरले. स्टेफन यांनी आपली संपत्ती मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले आणि शेवटी त्यांनी हार मानली. सायबर तज्ज्ञांचेही सर्व प्रयत्न थकले. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी आता चक्क मानसोपचारतज्ज्ञांकडे धाव घेतली आहे.
स्टेफन थॉमस यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्याकडे आज ७,००२ बिटकॉईन्सचा साठा असून, जागतिक बाजारपेठेनुसार त्याचे मूल्य ६ हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक आहे. ही प्रचंड संपत्ती त्यांनी 'आयर्न की' (IronKey) नावाच्या अत्यंत सुरक्षित डिजिटल वॉलेटमध्ये ठेवली आहे. मात्र, दुर्दैवाने या वॉलेटचा पासवर्ड त्यांच्या स्मृतीतून पूर्णपणे पुसला गेल्याने गफलत झाली आहे. हे वॉलेट सुरक्षिततेच्या दृष्टीने इतके कडक आहे की, त्यात पासवर्ड टाकण्यासाठी केवळ १० संधी मिळतात. जर १० पेक्षा जास्त वेळा चुकीचा पासवर्ड टाकला, तर हे वॉलेट सुरक्षिततेसाठी स्वतःमधील सर्व डेटा कायमचा नष्ट करते.
स्टेफन यांनी आतापर्यंत आठ वेळा वेगवेगळे पासवर्ड टाकून नशीब आजमावले आहे, परंतु दुर्दैवाने ते सर्व प्रयत्न अपयशी ठरले. आता त्यांच्याकडे केवळ दोन शेवटच्या संधी शिल्लक आहेत. जर पुढच्या दोन प्रयत्नांत योग्य पासवर्ड लागला नाही, तर त्यांची हजारो कोटींची संपत्ती एका क्षणात शून्यावर येईल. या भीतीपोटी त्यांनी उर्वरित दोन संधींचा वापर करणे सध्या थांबवले आहे.
जगभरातील मोठ्या सायबर सुरक्षा कंपन्यांनी हे वॉलेट 'हॅक' करून देण्याचे दावे केले आहेत, परंतु हा ६,५०० कोटींचा जुगार असल्याने स्टेफन सध्या कोणावरही विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. तंत्रज्ञानाने हात टेकल्यानंतर आता स्टेफन यांनी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. आपल्या सुप्त मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडलेला तो पासवर्ड 'हिप्नोटिझम' किंवा इतर मानसोपचार प्रक्रियेद्वारे आठवता येईल का, याचा प्रयत्न ते करत आहेत. तंत्रज्ञान आणि मानवी स्मृती यांच्यातील हा अजब लढा सध्या संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला आहे.