गोव्यात १०७ लोकांमागे एक मद्यालय; किरकोळ, घाऊक मिळून तब्बल १४,१०२ दारूची ठिकाणे

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
21 mins ago
गोव्यात १०७ लोकांमागे एक मद्यालय; किरकोळ, घाऊक मिळून तब्बल १४,१०२ दारूची ठिकाणे

पणजी : पर्यटकांसाठी नंदनवन असलेल्या गोव्यात (Goa) काही पर्यटक (Tourist) फक्त दारू व पार्टीचा आनंद घेण्यासाठी येतात. कोसाकोसावर बार वा दारूची दुकाने (Liquor shop) असल्याने गोव्यात दारू सहज उपलब्ध होते, असा सर्वसाधारण समज आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गोव्यात तब्बल १४,१०२ दारू मिळण्याची ठिकाणे आहेत. यात ठोस व किरकोळ बाटलीबंद दारूच्या दुकानांसह ग्लासमधून पिण्याची सोय असलेल्या बार्रांचा समावेश आहे. राज्याची लोकसंख्या १५ लाख धरली तर हे प्रमाण १०७ लोकांमागे एक दारूचे दुकान असे होते.

२०२५ वर्षाला निरोप देण्यासह नववर्षाच्या (New Year) स्वागतासाठी गोव्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. वर्षाच्या शेवटच्या दिवशी आज रात्री उशिरा पर्यंत पार्ट्या चालतील. मौजमजेसह स्थानिक व बहुतांशी पर्यटक हातात ग्लास घेऊनच नववर्षाचे स्वागत करतील.

एकंदरीत दारूची दुकाने व बार्रांची संख्या पाहिली तर नववर्षासाठीच नव्हे तर बाराही महिने गोव्यात सर्वत्र दारू उपलब्ध असते. राज्यात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघातांना जबाबदार असलेल्या अनेक कारणांपैकी मद्यपान करून वाहन चालविणे हे एक कारण आहे. दारूची दुकाने व बार्रांचा आकडा पाहिला तर चिंता करण्यासारखीच स्थिती आहे.

बार्देश तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ४ हजार, ७२२ दारूची दुकाने आहेत. सत्तरीत सर्वात कमी म्हणजे २६४ दुकाने आहेत. शहरी व किनारपट्टी क्षेत्र असलेल्या तालुक्यांत दारूच्या दुकानांचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवते.

तालुका दारूची दुकाने/बार

सांगे ३८१

मुरगाव ७८१

केपे ५८१

काणकोण ५४८

सासष्टी २५९१

फोंडा ९४९

डिचोली ४५४

पेडणे ११७०

तिसवाडी १६६१

सत्तरी २६४

बार्देश ४७२२

एकूण १४१०२


हेही वाचा