‘क्रॉस वोटिंग’वरून ‘आप’-काँग्रेसमध्ये जुंपली

एकमेकांवर बोट : दक्षिण झेडपी अध्यक्ष निवडीवेळी घडला होता प्रकार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
‘क्रॉस वोटिंग’वरून ‘आप’-काँग्रेसमध्ये जुंपली

पणजी : दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या ‘क्रॉस वोटिंग’वरून बुधवारीदेखील आरोप-प्रत्यारोप झाले. आपचे कोलवाचे जिल्हा पंचायत सदस्य अांतोनियो फर्नांडिस यांनी दक्षिण गोवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा यांच्या सांगण्यावरून काँग्रेस सदस्याने क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप केला, तर सावियो यांनी हा आरोप फेटाळत अांतोनियो यांनीच क्रॉस वोटिंग केल्याचा प्रत्यारोप केला.

बुधवारी नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्यांचा शपथविधी झाला. यानंतर अांतोनियो फर्नांडिस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. आप पक्षाने आम्ही भाजप विरोधी असल्याने काँग्रेसच्या उमेदवाराला मत देण्यास सांगितले होते. यानुसार मी काँग्रेस उमेदवारालाच मत दिले होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाचे सावियो डिसिल्वा

यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे ‘क्रॉस वोटिंग’मागे सावियो असण्याचीच शक्यता आहे. त्यांनीच आपल्या विजयी जिल्हा पंचायत सदस्याला क्रॉस वोटिंग करण्यास सांगितले असावे.

‘आप’ आमच्यासोबत कधीच नव्हता : सावियो

सावियो यांनी फर्नांडिस यांचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, आमच्यासोबत कोण होते आणि कोण नव्हते हे आम्हाला आधीपासूनच माहिती होते. आम्हाला ९ पैकी ९ मते मिळाली आहेत. आप आमच्यासोबत कधीच नव्हता. त्यांच्या सदस्यानेच भाजप उमेदवाराला मत दिले आहे. त्यामुळे क्रॉस वोटिंग झालेलेच नाही.

हेही वाचा