झाडे कापण्याचे नियम केले अधिक कठोर : जम‌िनीच्या सर्व मालकांची ‘ना हरकत’ बंधनकारक

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
झाडे कापण्याचे नियम केले अधिक कठोर : जम‌िनीच्या सर्व मालकांची ‘ना हरकत’ बंधनकारक

पणजी : गोव्यात (Goa) झाडे कापण्याचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. आता जमिनीच्या (Land)  सर्व मालकांचा ’ना हरकत’ घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. गोवा वन संवर्धन कायदा १९८४ (Goa Forest Conservation Act) च्या कलम ३५ अन्वये वन खात्याने आदेश जारी केला आहे.  

झाडे कापण्यासाठी कुणीही अर्ज केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जमिनीच्या मालकांची नावे तपासावी लागतील. सर्व मालकांकडून ’ना हरकत’ घेतल्यानंतर झाडे कापण्याची परवानगी देण्याची जबाबदारी अधिकाऱ्याची असणार. जमीन एका पेक्षा जास्त जणांच्या नावावर असल्यास एकाचा ‘ना हरकत’ दाखला पुरेसा नाही. सर्वांकडून ‘ना हरकत’ घेतल्यानंतर परवाना देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. तसेच परवाना दिल्यानंतर त्याची प्रत वन खात्याच्या संकेत स्थळावर लोड करावी लागणार. 

तसेच परवान्याची प्रत संबंधित पंचायत, गट विकास अधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय, वन अधिकारी कार्यालयांना पाठवावी लागणार. उपवन संरक्षकाला १ हेक्टर पर्यंतच्या जमिनीवरील २ ते ५० झाडे कापण्याची परवानगी देण्याचे अधिकार आहेत. याच्यापेक्षा जास्त झाडे कापण्याच्या परवान्यासाठी सरकारची मान्यता घ्यावी लागणार. परवानगी दिल्यानंतर परवानाधारकाला झाडे १० दिवसांनंतर कापण्यास मिळतील, अशी अट घालावी लागेल. त्यामुळे कुणालाही हरकत उपस्थित करण्याची संधी मिळेल. 

झाडे कापण्यासाठी परवाना दिल्यानंतर त्या परिसरातील नकाशा अधिकाऱ्याला गती शक्ती पोर्टलवर घालावा लागणार. कायद्याच्या कलम १० प्रमाणे परवाना दिल्यावर पुन्हा झाडे (वनीकरण) लावण्याची अट असणार आहे. झाडे न लावल्यास सुरक्षा रक्कम जप्त करण्याची पूर्वीची तरतूद असणार आहे.  

हेही वाचा