उपस्थित राहण्याचे निवृत्त न्या. फेर्दीन रिबेलो यांचे आवाहन

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्याच्या संरक्षणासाठी लोकचळवळ उभारण्याबाबत मंगळवार, ६ रोजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात दुपारी ३.३० वा. सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत लोकचळवळ पुढे नेण्यासाठी भविष्यातील कृती आराखडा तयार केला जाणार आहे. निवृत्त न्या. फेर्दीन रिबेलो यांनी ही माहिती दिली. हितचिंतकांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहनही रिबेलो यांनी केले.
निवृत्ती न्या. रिबेलो म्हणाले की, मी समाज माध्यमात गोव्याच्या सुरू असलेल्या विनाशाबाबत पोस्ट टाकली होती. त्याला निज गोमंतकीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. माध्यमांनीही प्रभावीपणे हा मुद्दा उचलून धरला. यामुळे गोव्याच्या संरक्षणासाठी संयुक्त ‘लोकचळवळी’च्या हाकेला बळ मिळाले. हा लढा तार्किक आणि न्याय्य निष्कर्षापर्यंत नेण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे. भावी पिढ्यांसाठी गोव्याचे संरक्षण करण्यासाठी असे करणे आवश्यक आहे.
ज्यांनी पाठिंबा दिला, संपर्क साधला, अर्थपूर्ण योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली, अशा सर्वांची बैठक बोलावली आहे. बैठकीत प्रस्तावित ‘लोक सनदे’च्या मसुद्यावर विचारविनिमय केला जाईल. त्यात सुधारणा आणि सूचना समाविष्ट करून चळवळ पुढे नेण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाईल. गोव्याचा आत्मा जपण्यासाठी कटिबद्ध गोमंतकीयांनी बैठकीला उपस्थित राहावे.