राज्यात २०२५ मध्ये डेंग्यूचे केवळ १०५ रुग्ण

राष्ट्रीय वेक्टर बोर्न रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या उपसंचालिका डॉ. कल्पना महात्मे यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
राज्यात २०२५ मध्ये डेंग्यूचे केवळ १०५ रुग्ण

पण​जी : राज्यात २०२५ मध्ये डेंग्यूचे एकूण १०५ रुग्ण आढळले असून, ही संख्या मागील अकरा वर्षांतील सर्वांत कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यावर्षी डेंग्यूमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती राष्ट्रीय वेक्टर बोर्न रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या उपसंचालिका डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.
डॉ. महात्मे यांनी सांगितले की, २०२४ मध्ये राज्यात ५६७ डेंग्यू रुग्ण आढळले होते. ही संख्या कमी करण्यासाठी आरोग्य खात्याने २०२५ मध्ये अधिक कडक आणि प्रभावी उपाययोजना राबवल्या. यामध्ये डेंग्यू वारंवार आढळणाऱ्या म्हणजेच हॉटस्पॉट भागांमध्ये विशेष तपासणी, तसेच घरोघरी जाऊन पाहणी करण्यात आली.
आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता होती, तेथे कचरा उचल, पाणी साठवण टाळणे आणि औषध फवारणी करण्यात आली. याशिवाय अन्य खात्यांशी समन्वय साधून संयुक्त मोहिमा राबवण्यात आल्या.
तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि नागरी आरोग्य केंद्रांमध्ये तापासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची डेंग्यू व मलेरियासाठी तपासणी करण्यात आली. त्यामुळे डेंग्यू रुग्णांची वेळेत ओळख होऊन उपचार करणे सुलभ झाले, असे डॉ. महात्मे यांनी सांगितले.
२०२५ मध्ये आढळलेले बहुतांश डेंग्यू रुग्ण स्थलांतरित वस्तीमधील असल्याचेही त्यांनी नमूद केले. बांधकाम स्थळांवर उघड्यावर पाणी साठवले जात असल्यामुळे तेथे डासांची पैदास होते. अशा ठिकाणी काही रुग्ण आढळले. तसेच काही रुग्ण हे परराज्यातील डेंग्यू हॉटस्पॉट भागातून गोव्यात आलेले होते.
वेळीच लक्षणे ओळखा
डॉ. महात्मे यांनी सांगितले की, डेंग्यूच्या उपचारांसाठी सरकारी रुग्णालये व दवाखान्यांमध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा मोफत उपलब्ध आहेत. डेंग्यूची लक्षणे वेळीच ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ताप न उतरणे, पोटात तीव्र वेदना, घाम येणे किंवा थंडी वाजणे, उलट्या होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
डेंग्यू रुग्ण व मृत्यू : वर्षनिहाय तक्ता
वर्ष                 रुग्ण संख्या               मृत्यू

२०१५             २९३                          ०
२०१६             १५०                          ०
२०१७             २३५                          ०
२०१८            ३३५                           १
२०१९            ७२६                           १
२०२०            ३७६                           ०
२०२१            ६४९                            ०
२०२२            ४४३                            १
२०२३            ५१२                            ३
२०२४            ५६७                           ३
२०२५            १०५                            ०