१.४२ कोटींची लूट, दुसऱ्याला ८७ लाखांचा गंडा

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून आणि जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्याशी निगडित मनी लाँड्रिंगचे व्यवहार केल्याचे सांगून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली डिचोली तालुक्यातील एका महिलेची १.४२ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. तसेच आणखी एका ज्येष्ठ नागरिकाची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ८७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. दोन्ही प्रकरणांत सायबर गुन्हा विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डिचोली तालुक्यातील एका ५४ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदार महिलेला केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून ७९०८२६३९२६, ८२५०६९११५९,८४८६५८७४१८, आणि ८८७६१३८०६० या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून कॉल केला. जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात, तसेच सोने आणि हिरे तस्करीत तक्रारदाराचा सहभाग असल्याचे सांगितले. तक्रारदार महिलेवर १५ ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे दबाव टाकण्यात आला. हे प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँक खात्यांत १ कोटी ४२ लाख ४ हजार ८६८ रुपये जमा करण्यास भाग पाडले. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
वृद्धाची ८७ लाखांची फसवणूक
दुसऱ्या प्रकरणात सासष्टीतील ६६ वर्षीय वृद्ध नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदाराला सीआयडी अधिकारी असल्याचे भासवून ९१२९९८४८२१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून कॉल करून संपर्क साधला. त्याचे आधार कार्ड वापरून मोबाईल सिम घेतले. त्याचा वापर मनी लाँड्रिंग प्रकरणात झाला असल्याचे सांगितले. तक्रारदारावर १७ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे दबाव टाकण्यात आला. हे प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँकांच्या खात्यांत ८७ लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.