कार्मिक खात्याकडून आदेश जारी

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
पणजी : कित्येक सरकारी कर्मचारी कलाकार आहेत. कलेचा वापर ते व्यावसायिक स्वरूपात करतात. यामुळे प्रशासनातील कामांवर परिणाम होऊ शकतो. कार्मिक खात्याने अशा कर्मचाऱ्यांसाठी थेट आदेश जारी केला आहे. कार्यालयीन वेळेत व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, असे आदेशात म्हटले आहे.
लोकांना योग्य सरकारी सेवा मिळावी, प्रशासन सुशासन व्हावे म्हणून सरकार दिवस-रात्र एक करत आहे. ‘सरकारी काम १२ महिने थांब’, अशी म्हण आहे. ती चुकीची ठरविण्यासाठी सरकारने कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून कार्यालयात अचानक आमदार-मंत्री जातात, कर्मचाऱ्यांची हजेरी घेतात, कितीजण वेळेत कामाला येतात, कितीजण दांडी मारतात, कामाच्या वेळेत किती कर्मचारी कार्यालयात असतात, हे पाहतात. यामुळे सरकारी कर्मचारी काही प्रमाणात वठणीवर आले आहेत.