शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राचा दगडाने ठेचून खून

कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात खळबळ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th January, 12:22 pm
शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राचा दगडाने ठेचून खून

कोल्हापूर: दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान एका भीषण हत्याकांडांत झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. शिवीगाळ केल्याच्या कारणावरून संतापलेल्या एका तरुणाने आपल्याच जीवलग मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयिताला तातडीने ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

विकास दत्तात्रय भोसले (वय ३२, मूळ राहणार येलूर, मलकापूर, ता. शाहूवाडी, सध्या रा. विक्रमनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी ओंकार महादेव काळे (वय २५, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर) याला अटक केली आहे. विकास आणि ओंकार हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. विकास गेल्या पाच वर्षांपासून विक्रमनगर परिसरात राहून मजुरीची कामे करत होता. शनिवारी दिवसभर हे दोघेही एकत्र होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हे दोघे मित्र विक्रमनगरमधील जोशी गल्ली परिसरात दारू पिण्यासाठी गेले होते. दारू पित असतानाच दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वादाची ठिणगी पडली. दारूची नशा चढलेली असल्याने हा वाद विकोपाला गेला. वादादरम्यान विकासने ओंकारला शिवीगाळ केली. या शिवीगाळीचा राग अनावर झाल्याने ओंकारने विकासला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. संतापाच्या भरात ओंकारने बाजूला असलेला एक मोठा दगड विकासच्या डोक्यात घातला.

हा हल्ला इतका भीषण होता की, विकास जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. परिसरातील नागरिकांनी तातडीने गंभीर जखमी झालेल्या विकासला उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे दाखल केले. मात्र, डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

राजारामपुरी पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून संशयित ओंकार काळे याला काही वेळातच ताब्यात घेतले. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विक्रमनगर परिसरातील नागरिकांनी सीपीआर रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. एका क्षुल्लक वादातून आणि दारूच्या नशेत एका तरुणाने आपल्याच मित्राचा बळी घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा