साताऱ्यातील संमेलनाला वादाची किनार, नियोजनातील त्रुटींमुळे रसिक नाराज

सातारा: छत्रपतींच्या पावन भूमीत साताऱ्यात सध्या ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडत असले, तरी या संमेलनाला वादाची मोठी किनार लाभली आहे. साहित्याचा जागर होण्याऐवजी हे संमेलन राजकारण्यांच्या प्रसिद्धीचे केंद्र बनल्याची टीका सध्या सर्वस्तरांतून होत आहे. संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या ‘संभाजी’ कादंबरीवरून झालेली निदर्शने, कार्याध्यक्षांवर झालेली शाईफेक आणि नियोजनातील ढिसाळपणामुळे हे संमेलन यंदा वेगळ्याच कारणांनी चर्चेत आले आहे.

संमेलनाच्या सुरुवातीपासूनच राजकीय वर्चस्वाचे दर्शन साताऱ्यात घडले. संपूर्ण शहरभर लावलेल्या स्वागत कमानींवर साहित्य आणि साहित्यकारांपेक्षा राजकारण्यांचेच फोटो अधिक झळकत असल्याने साहित्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. साहित्याची आवड किती यापेक्षा संमेलन घडवून आणण्याची जिद्द महत्त्वाची, अशा शब्दांत स्वागताध्यक्षांचे कौतुक मंचावरून झाल्याने साहित्याचा मूळ उद्देश बाजूला राहिल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातील आ. ह. साळुंखे आणि दत्तप्रसाद दाभोळकर यांसारख्या दिग्गज साहित्यिकांना डावलल्याचा आरोप सोशल मीडियावरून होत असल्याने आयोजकांवर टीकास्त्र सोडले जात आहे.

नियोजनाच्या पातळीवरही या संमेलनात अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. निमंत्रित साहित्यिकांसाठी चांदीच्या ताटात भोजनाची व्यवस्था असताना, लांबून आलेल्या सामान्य रसिक आणि साहित्यप्रेमींना साध्या चहासाठी आणि पासेससाठी वणवण करावी लागत आहे. ज्यांनी आधी नोंदणी केली नाही, त्यांना भोजन आणि निवासाची कोणतीही सोय उपलब्ध करून दिली नसल्याने स्वागत कक्षावर वादविवाद पाहायला मिळाले. साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या रसिकांची ही अडवणूक संमेलनाच्या प्रतिमेला तडा देणारी ठरत आहे.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव संमेलनात काळ्या रंगाचे कपडे घालून येण्यास बंदी घालण्यात आली होती. या निर्णयाचा फटका युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्यासह अनेक रसिकांना बसला. काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्यांना प्रवेश नाकारल्याने साहित्य वर्तुळात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ही बंदी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याची भावना साहित्यिकांनी व्यक्त केली आहे.
संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर एका तरुणाने शाईफेक करून काळे फासल्याचा प्रकार घडला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर काहीच नाही मिळत पण, सरकार संमेलनाला मात्र दोन कोटी रुपये देते, असा निषेध नोंदवत संदीप जाधव या तरुणाने हे कृत्य केले. या हल्ल्यामुळे संमेलनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, साहित्याचे व्यासपीठावर साहित्याची चर्चा बाजूला पडून ते नको त्या कारणाने गाजत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. एकूणच, ९९ वे साहित्य संमेलन साहित्याच्या वैचारिक घुसळणीऐवजी राजकीय आखाडा आणि वादाचे केंद्र बनल्याने खऱ्या साहित्यप्रेमींमध्ये निराशेचे वातावरण आहे.
