चिंबलमध्ये ग्रामस्थांच्या आंदोलनाला राजकीय पक्षांचा पाठिंबा

पणजी: चिंबल येथील तोयार तलावाच्या परिसरात प्रस्तावित असलेला 'युनिटी मॉल' आणि 'प्रशासन स्तंभ' प्रकल्प जोपर्यंत पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण आणि आंदोलन सुरूच ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्धार रविवारी झालेल्या जाहीर सभेत करण्यात आला. या प्रकल्पाविरोधात चिंबल ग्रामस्थांनी पुकारलेल्या या लढ्याला काँग्रेस, रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी), आम आदमी पार्टी (आप) या राजकीय पक्षांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पर्यावरणप्रेमींनी आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
गेल्या २८ डिसेंबरपासून चिंबल येथे तोयार तळ्याच्या संवर्धनासाठी आणि प्रस्तावित मॉलच्या विरोधात ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे. रविवारी सकाळी उपोषणस्थळी झालेल्या सभेत "युनिटी मॉल आम्हाला नको" अशा तीव्र घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधात पर्यटन महामंडळ (GTDC) आणि नगर नियोजन (TCP) खात्यावर धडक देऊन निवेदने सादर करण्याचा ठराव संमत केला. तसेच, गोव्यातील इतर भागांत सुरू असलेल्या स्थानिक आंदोलनांनाही चिंबल ग्रामस्थ पाठिंबा देतील, असे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी बोलताना काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर कडाडून टीका केली. भाजप सरकार दिल्लीतील बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी गोव्याचे पर्यावरण, संस्कृती आणि जमीन विकायला निघाल्याचा आरोप त्यांनी केला. म्हादईनंतर आता तलाव आणि डोंगर संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, त्यांनी या लढ्यात काँग्रेस ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे आश्वासन दिले. आमदार विरेश बोरकर यांनी देखील या प्रकल्पाला विधानसभेत विरोध केल्याची आठवण करून दिली. लोकांचा विरोध असलेल्या आणि पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्रकल्पांना माझा विरोध कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या सभेला आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, ॲड. अमित पालेकर, पर्यावरणवादी रमेश गावस, सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी, अल्बेर्टिना आल्मेदा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, सभेत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारला टोला लगावताना युरी आलेमाव यांनी खोचक विधान केले. भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. सरकारमधील काही लोकांच्या पोटांचे घेर पैसे खाऊन सुटले आहेत. मी, विरेश (बोरकर) आणि कार्लूस (फेरेरा) पैसे खात नाही, म्हणूनच आम्ही स्लिम आहोत. अशी टिप्पणी त्यांनी केली. सध्या या आंदोलनामुळे चिंबलमध्ये वातावरण तापले असून प्रकल्प रद्द होईपर्यंत माघार न घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
