
नवी दिल्ली : २०२३ मध्ये रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) चलनातून बाद ठरवलेल्या २००० रुपयांच्या नोटा (Two Thousand Rupees Note) अजून पूर्णपणे बॅंकेत परत आलेल्या नाहीत. मावळत्या २०२५ वर्षामध्ये पाच हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या दोन हजाराच्या नोटा बॅंकेत परत आलेल्या नाहीत. ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत एकूण ५,६६९ कोटी रुपये मूल्यांच्या २ हजार रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा झालेल्या नाहीत. रिझर्व्ह बॅंकेने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर सर्व नोटा बॅंकेत जमा करणे आवश्यक होते. बाजारात त्यावेळी ३.५६ लाख कोटी रुपयांच्या २ हजार रुपयांच्या नोटा होत्या. मात्र, ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत ५,६६९ कोटी रुपये मूल्यांच्या २ हजार रुपयांच्या नोटा बॅंकेत परत येणे बाकी असल्याची माहिती पुढे आली आहे.