
नवी दिल्ली (New Delhi) : २०२० मधील दिल्ली दंगलीप्रकरणी (Riot) सर्वोच न्यायालयाने (Supreme Court) उमर खालिद (Umar Khalid) व शरजील इमाम (Sharjeel Imam) या दोघांचे जामीन अर्ज फेटाळले. या दोघांचे जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने एक वर्षपर्यंत पुन्हा जामीन अर्ज दाखल करता येणार नसल्याची अट घातली आहे. याप्रकरणातील इतर पाचजणांना बारा अटी घालून जामीन मंजूर केला आहे.
दिल्ली दंगलीप्रकरणी उमर खालिद, शरजील इमाम, गुलफिशा फातिमा, मीरान हैदर, शिफा उर रहमान, मोहम्मद सलीम खान व शादाब अहमद हे सुमारे पाच वर्षे, तीन महिने तुरुंगात आहेत. याप्रकरणी सध्या न्यायप्रक्रिया सुरू आहे. दिल्ली उच्च न्यायालयात या सर्वांनी UAPA अंतर्गत जामीन अर्ज दाखल केले होते. उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर या सर्वांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
जामीन फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, संविधानातील अनुच्छेद २१ (स्वातंत्र्याचा हक्क) ही अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. खटला पूर्ण होण्यापूर्वीची कैदेची शिक्षा ही शिक्षा असू शकत नाही. मात्र, UAPA हा विशेष कायदा आहे व जामीन देताना त्यातील तरतुदींचा स्वतंत्रपणे विचार करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.