'बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवा'च्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले.

मडगाव : देशातील नेत्यांबाबत एक 'नरेटिव्ह' सेट करण्यात आला होता, सर्व गोष्टींचे 'काँग्रेसीकरण' करण्याचा प्रयत्न झाला होता. धर्मासाठी आणि राष्ट्रासाठी कार्य केलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांची नव्या पिढीला ओळख व्हावी, यासाठी भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून त्यामागे प्रबोधनाचा उद्देश आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले.
मडगाव येथील 'बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवा'च्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आई-वडील, शिक्षक आणि चित्रपट हे तीन घटक महत्त्वाचे ठरतात. चित्रपटांचा मनावर मोठा पगडा असतो आणि मुले चित्रपटातील गोष्टींचे अनुकरण करतात. त्यामुळेच देशासाठी आणि धर्मासाठी कार्य केलेल्या महापुरुषांवरील चित्रपट मुलांना दाखवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेनुसार, या चित्रपट महोत्सवातून मुलांना सकस आहाराची माहिती आणि गोव्यातील पारंपारिक खाद्यसंस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे. सात्विक आहार ही काळाची गरज असून, त्यातून रोजगारनिर्मितीही होऊ शकते.

काही लोक भाजपच्या सततच्या कार्यक्रमांवर प्रश्न उपस्थित करतात. मात्र, भाजपने बिरसा मुंडा यांच्या स्मृती जागवल्या, अटल स्मृती आणि बाल साहस दिन यांसारखे उपक्रम राबवले. हे कार्यक्रम केवळ वेळ घालवण्यासाठी नसून इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आहेत. आजच्या मुलांना विचारले तर ते महात्मा गांधी किंवा पंडित नेहरूंची नावे घेतात, पण त्यांना बिरसा मुंडा, झोरावर सिंह किंवा फत्तेसिंग यांच्या बलिदानाची माहिती नसते. अहिल्याबाई होळकरांची क्रांती त्यांना ठाऊक नसते. जाणीवपूर्वक ठराविक नेत्यांचीच नावे रुजवण्याचा जो प्रयत्न झाला, तो समज खोडून काढण्यासाठी भाजप सक्रिय आहे. नव्या पिढीने या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श घ्यावा आणि त्यातूनच भारत 'विश्वगुरू' होण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.

स्थानिक चित्रपटांना पाठिंबा आवश्यक बिपीन खेडेकर यांच्या उदाहरणाचा संदर्भ देत नाईक म्हणाले की, त्यांच्या पहिल्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले, मात्र स्थानिक प्रेक्षकांचा प्रतिसाद नसल्यामुळे त्यांनी पुढील निर्मिती करण्यास नकार दिला. गोव्यातील लोकांनी स्थानिक कलाकारांच्या कलाकृतींना पाठिंबा देणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.