मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : टॅक्सीमालकांनी पणजीत घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

आल्तिनो पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जमलेले टॅक्सीमालक आणि बंदोबस्तासाठी तैनात पोलीस. (नारायण पिसुर्लेकर)
....
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सींसाठी केवळ दोन मिनिटांची प्रतीक्षा वेळ ठेवून त्यापुढे शुल्क आकारण्याच्या जीएमआर कंपनीच्या निर्णयाचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचला आहे. प्रतीक्षा वेळ किमान दहा मिनिटे ठेवावी, अशी मागणी टॅक्सीचालकांनी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतीक्षा वेळ पाच मिनिटे करण्याचे आश्वासन दिले. तसेच दहा मिनिटांपर्यंत वेळ वाढवता येईल का, याचा विचार केला जाईल, असे सांगितले.
जीएमआर कंपनीने मोपा विमानतळावर टॅक्सींसाठी प्रवाशांची प्रतीक्षा वेळ केवळ दोन मिनिटांपर्यंत मर्यादित ठेवली असून, त्यानंतर तब्बल २०० रुपये शुल्क आकारले जात आहे, असे टॅक्सीचालकांनी सांगितले. या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करत उत्तर व दक्षिण गोव्यातील टॅक्सी संघटनांनी एकत्र येऊन आल्तिनो-पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. आम्हाला दोन मिनिटांची प्रतीक्षा वेळ मान्य नाही. ती किमान दहा मिनिटे असावी, असा ठराव आम्ही बैठकीत घेतला आहे, असे टॅक्सीचालकांच्या प्रतिनिधींनी सांगितले. टॅक्सीमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, तसेच लहान मुले असतात. अशा वेळी दोन मिनिटांत वाहन बाहेर काढणे शक्य होत नाही. शिवाय २१० रुपयांचे प्रतीक्षा शुल्क देणे प्रवाशांनाही परवडणारे नाही. ही बाब पोलीस निरीक्षक आणि मामलेदारांसमोर मांडली होती. मामलेदार व विमानतळ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. विमानतळ अधिकाऱ्यांनी पाच मिनिटांची सवलत देण्यास हरकत नसल्याचे सांगून हा विषय सरकारसमोर मांडण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आम्ही थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर आलो आहोत, असे प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
आश्वासन न पाळल्यास आंदोलन
मुख्यमंत्र्यांनी टॅक्सींसाठी पाच मिनिटांची पार्किंग सवलत देण्यास मान्यता दिली असून दोन मिनिटांनंतर आकारले जाणारे शुल्क तात्पुरते बंद करण्याचे निर्देश दिल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. दरम्यान, जीएमआर कंपनीने दिलेले आश्वासन पाळले नाही आणि पुन्हा शुल्क आकारण्यात आले, तर विमानतळावरच टॅक्सी उभ्या करून आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा टॅक्सी संघटनांच्या दुसऱ्या प्रतिनिधीने दिला.