राज्यपालांच्या मान्यतेनंतर होणार नियुक्ती

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्याच्या नवीन लोकायुक्तांची घोषणा गुरुवारी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीत दोन नावांवर चर्चा झाली असून अंतिम नाव उच्च न्यायालयाच्या समितीला पाठविले जाईल. राज्यपालानी मान्यता दिल्यानंतर होणार नियुक्ती, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
बैठकीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव उपस्थित होते. बैठकीत दोन नावांवर चर्चा झाली. बैठकीतील इतिवृत्ताला मान्यता दिल्यानंतर नाव जाहीर केले जाईल. इतिवृत्तावर स्वाक्षरी होईपर्यंत नाव जाहीर करता येत नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
लोकायुक्तपद बरेच महिने रिक्त असल्याने प्रलंबित तक्रारींचा आकडा वाढत आहे. लोकायुक्तांची घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यानी दिली. बैठकीत चर्चा झालेले चिपळूण येथील संदीप शिंदे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून २०२३ मध्ये निवृत्त झाले. वकील व न्यायाधीश म्हणून दीर्घ अनुभव त्यांना आहे.