सार्वजनिक बांधकाम खात्यातील नवीन कर्मचाऱ्यांना दिली नियुक्तीपत्रे

पणजी : चांगले प्रशासन (Administration) आणि पारदर्शकता ही काळाची गरज आहे. त्यासाठी कुठल्याही आमिषांना बळी पडू नये. सरकार निलंबन किंवा बडतर्फ करण्यासाठी मागचापुढचा विचार करणार नाही. नंतर जर बदली करण्यासाठी आमदारांची (MLA) शिफारस घेऊन आल्यास दूरच्या ठिकाणी बदली केली जाणार, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी नव्याने भरती केलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांना दिला.
कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातून बांधकाम खात्यात (PWD) निवड झालेल्या ९५ कनिष्ठ अभियंते आणि तांत्रिक अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पर्वरी मंत्रालयात झाले. या नव्याने भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना संबोधीत करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, मुख्य सचिव व्ही. कांदावेलू, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
हुशार पात्र उमेदवारांची कर्मचारी भरती आयोगाच्या पारदर्शक प्रक्रीयेतून भरती केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पूर्वी २५ वेळा अर्ज करावे लागत होते. परीक्षा द्यावी लागायची आणि निकालाची वाट बघावी लागायची. तसेच निकालानंतर खूप जणांच्या तक्रारीही येत होत्या. आता एका वेळी ग्रामीण विकास खाते, सार्वजनिक बांधकाम खाते आणि वीज खात्यात सीबीटी परीक्षा घेऊन एकाच वेळी पदांची भरती १०० टक्के पारदर्शक पद्धतीने होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तुमची निवड किती पारदर्शक पद्धतीने झाली आहे हे इतरांना सांगण्याची आवश्यकता आहे. जे कोणी चिंदी चोर येऊन सांगतात तुमचे काम करतो म्हणून; त्यांना ठेचून काढा. केवळ मेरीटच्या आधारावर नोकरी मिळते हा स्पष्ट संदेश जाणे गरजेचे असल्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
पुढील ३० वर्षे तुम्ही प्रशासनात सेवा देणार. तुमच्यातील कोणी एखादा पुढे प्रधान मुख्य अभियंता म्हणून काम करणार. त्यासाठी चांगले प्रशासन आणि पारदर्शकता ही काळाची गरज आहे. आमिषांना बळी पडून आपला सीआर खराब करून घेऊ नये. निलंबित करण्यास किंवा बडतर्फ करण्यास आम्ही मागचापुढचा विचार करणार नाही. आपल्या कार्यकाळात २० ते २५ जण निलंबित झाले आहेत; अशी समज मुख्यमंत्र्यांनी दिली. कुणालाही पेडणेतून काढून काणकोणला घातलेले नाही. सर्वांची त्यांच्या तालुक्याच्या आतच निवड झाली आहे. आपल्या घराजवळ बदली मागू नका. बदली दुसरीकडे करावी; अशी शिफारस आमदारांकडे घेऊन आल्यास अजून दूरवर बदली करणार. आपल्या हक्कांचा दुरुपयोग करू नका. तुमच्या पालकांना तुमच्याच चुकींची माफी मागण्यासाठी येण्यास लावू नका, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
कसलाच वशिला नसताना मेरीटच्या आधारावर गरीब मुलांना नोकरी दिली; असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला. त्यासाठी गरीब लोकांकडे संवेदनशील राहून त्यांना मदत करावी. लक्षात ठेवा तुमची निवड ही मेरीटवर झाली आहे. जशे तुम्ही नोकरीसाठी कुठलेच आमिष दिले नाही; तसेच गरीब जनतेला देण्याची पाळी येऊ नये, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी केले.