स्वतःवर ५० लाखांचे कर्ज असूनही घेतलेला संकल्प पूर्ण केला; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल.

कोप्पल : शिक्षक हा केवळ ज्ञानाचे दान देत नाही, तर तो विद्यार्थ्यांच्या इवल्याशा पंखांना स्वप्नांची नवी क्षितीजे पादाक्रांत करण्याची शक्ती देतो. याचा प्रत्यय कर्नाटकच्या एका लहानशा गावात आला आहे. कोप्पल जिल्ह्यातील बहादुरबांदी या दुर्गम गावातील सरकारी हायस्कूलचे मुख्याध्यापक बीरप्पा अंदगी यांनी स्वखर्चाने आपल्या २४ विद्यार्थ्यांना विमानाने बंगळुरूची सफर घडवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आकाशात उडणारे विमान दुरून पाहणाऱ्या या गरीब कुटुंबातील मुलांसाठी हा प्रवास म्हणजे एखाद्या परीकथेसारखा होता.
मुख्याध्यापक बीरप्पा अंदगी यांनी जेव्हा या शाळेचा पदभार स्वीकारला, तेव्हाच त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना विमानप्रवास घडवण्याचा निश्चय केला होता. हा निश्चय पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून तब्बल ५ लाख रुपये खर्च केले. विशेष म्हणजे, अंदगी यांच्यावर स्वतःचे ५० लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज असतानाही, त्यांनी मुलांच्या आनंदाला सर्वोच्च प्राधान्य दिले. या उपक्रमात त्यांच्या एका जिवलग मित्रानेही आर्थिक हातभार लावला. ५ वी ते ८ वी मधील गुणवंत मुलांची गुणवत्ता चाचणीद्वारे निवड करण्यात आली. हे सर्व विद्यार्थी जिंदाल विमानतळावरून बंगळुरूसाठी रवाना झाले, तेव्हा संपूर्ण गाव या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गोळा झाले होते.

"विद्यार्थी हे देवासारखे आहेत आणि त्यांना आनंद देता आला हेच माझे भाग्य आहे," अशा भावना अंदगी यांनी व्यक्त केल्या. या सहलीमध्ये केवळ विमानप्रवासच नाही, तर मुलांचे भोजन, निवास आणि बंगळुरूतील विविध पर्यटन तसेच शैक्षणिक स्थळांच्या भेटींचे नियोजनही करण्यात आले. ग्रामीण भागातील मुलांनी केवळ मोठी स्वप्ने पाहू नयेत, तर ती पूर्ण करण्याची हिंमतही ठेवावी, या हेतूने अंदगी यांनी हे धाडस केले आहे. त्यांच्या या दातृत्वाची आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निष्ठेची कथा आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, संपूर्ण गावातून आणि शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही केवळ एक सहल नसून, एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांना दिलेली खऱ्या अर्थाने भरारी आहे.