आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने मच्छिमारांच्या प्रगतीला आणि सक्षमीकरणाला मिळणार नवे बळ!

'ॲक्वा गोवा फिश फेस्टिव्हल' चे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
09th January, 05:01 pm
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने मच्छिमारांच्या प्रगतीला आणि सक्षमीकरणाला मिळणार नवे बळ!

पणजी: मत्स्य उत्पादनात वाढ करणे, प्रक्रिया युनिट आणि कोल्ड चेन सारख्या सुविधांमधील त्रुटी दूर करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मच्छिमारांच्या रोजगाराला बळकटी देणे, हाच 'ॲक्वा गोवा फिश फेस्टिव्हल'चा मुख्य उद्देश आहे. मच्छिमारी व्यवसायाला पाठबळ देऊन आम्ही केवळ उद्योगाला नव्हे, तर गोव्याची सांस्कृतिक ओळख जपण्याचे काम करत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.



पणजी येथे शुक्रवारी 'ॲक्वा गोवा फिश फेस्टिव्हल'निमित्त आयोजित विशेष राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री निळकंठ हळर्णकर, मत्स्यव्यवसाय खात्याचे सचिव प्रसन्न आचार्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात गोवेकरांना विविध प्रकारचे मासे पाहण्याची संधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.




या महोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिसंवादात धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर आले आहेत. या चर्चेचा मुख्य रोख मत्स्यव्यवसाय क्षेत्राला सरकारी आराखड्याद्वारे बळकटी देणे आणि सागरी पर्यावरणातील जैवविविधतेचे संवर्धन करणे हा आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, जेव्हा आपण मत्स्यव्यवसायाला पाठिंबा देतो, तेव्हा आपण या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना आधार देतो. मासे आणि मत्स्यव्यवसाय हा गोव्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून ती आपली संस्कृती आहे. गोव्यातील पाहुणचार हा जेवणात ताजी मासळी असल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि बहुतांश गोवेकरांची सकाळ मासे बाजारातील आवाजानेच होते, अशा शब्दांत त्यांनी गोवेकरांचे माशांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते स्पष्ट केले.




मच्छिमारांच्या कष्टाचा गौरव करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या ताटात येणाऱ्या मासळीमागे मच्छिमारांची मोठी मेहनत असते. पहाटे उठून समुद्रातील अनिश्चित परिस्थितीचा सामना करणे सोपे काम नाही, त्यासाठी प्रचंड कौशल्य आणि धैर्याची गरज असते. हा महोत्सव म्हणजे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी सांगितले की, पारंपरिक आणि आधुनिक मच्छिमारांना एका छत्राखाली आणून या क्षेत्रात नाविन्य आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन सामान्यांपर्यंत पोहोचवून हा व्यवसाय शाश्वत कसा करता येईल, यावर या महोत्सवात विशेष भर दिला जाणार आहे.

हेही वाचा