डिलिव्हरी बॉयने इंस्टाग्रामवर कथन केला त्याच्यासोबर घडलेला धक्कादायक प्रसंग.म्हणाला-आज एक जीव वाचवल्याचे समाधान लाभले. पहा व्हिडिओ.

चेन्नई: तंत्रज्ञानाच्या युगात आज सर्वकाही एका क्लिकवर उपलब्ध होत असताना, माणसांमधील माणुसकी आणि संवेदनशीलता मात्र हरवत चालल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. परंतु, तमिळनाडूमध्ये एका 'ब्लिंकिट' (Blinkit) डिलिव्हरी एजंटने आपल्या सतर्कतेने एका तरुण मुलीला मृत्यूच्या दारातून परत आणले आहे.
![]()
नेहमीप्रमाणे या डिलिव्हरी एजंटला एका ऑर्डरचे नोटिफिकेशन मिळाले. ऑर्डरमध्ये उंदीर मारण्याच्या औषधाची तीन पाकिटे होती. रात्रीच्या वेळी एवढ्या घाईत ही ऑर्डर का दिली असावी, असा विचार करत तो पत्त्यावर पोहोचला. जेव्हा त्या तरुणीने दरवाजा उघडला, तेव्हा ती प्रचंड रडत होती आणि तिची अवस्था पाहून तो हादरला. तिच्या डोळ्यांतील पाणी आणि भीती पाहून तो केवळ एक पार्सल देणारा कर्मचारी न राहता, एक संवेदनशील माणूस म्हणून तिच्याशी बोलू लागला. तिला विश्वासात घेऊन त्याने विचारले की, तिने हे विष स्वतःला संपवण्यासाठी मागवले आहे का? सुरुवातीला तिने नकार दिला, मात्र तिच्या रडण्यावरून त्याला संशय आला. त्याने तिला समजावले की, जर खरोखर उंदरांचा त्रास असता तर ही ऑर्डर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळीही देता आली असती, इतक्या रात्री नाही.
डिलिव्हरी एजंटने तिला कळकळीची विनंती केली की, कितीही मोठे संकट आले तरी स्वतःचा जीव देऊ नका, ही वेळही निघून जाईल. त्याने केवळ उपदेश केला नाही, तर स्वतःहून ती ऑर्डर रद्द केली आणि ते औषध सोबत परत नेले. या घटनेनंतर त्याने सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, आज मला खरोखर काहीतरी चांगले काम केल्याचे समाधान मिळाले आहे. सोशल मीडियावर हा किस्सा व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे. रोबोटने कदाचित वेळेत डिलिव्हरी दिली असती, पण या माणसाने संवेदना पोहोचवून जीव वाचवला, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
अनेकांनी या डिलिव्हरी बॉयच्या कौशल्याचा आणि प्रसंगावधनाचा गौरव करत ब्लिंकिट कंपनीकडे त्याला सन्मानित करण्याची मागणी केली आहे. माणसाने जराशी संवेदनशिलता दाखवली तर किती मोठे अनर्थ टाळता येतात, याचे हे एक अत्यंत हृदयस्पर्शी उदाहरण ठरले आहे.