पोलिसांनीच ८ वर्षे सामूहिक बलात्कार केल्याची महिला पोलीस कॉन्स्टेबलची तक्रार

पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश : राजस्थान पोलिसांकडून तपास सुरू; वश करण्यासाठी काळ्या जादूचा वापर केल्याचा आरोप

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10th January, 11:43 am
पोलिसांनीच ८ वर्षे सामूहिक बलात्कार केल्याची महिला पोलीस कॉन्स्टेबलची तक्रार

जयपुर : काही पोलिसांनीच आपल्यावर सलग ८ वर्षे सामूहिक बलात्कार (Rape) करण्यात आल्याची तक्रार एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने (Woman Police Constable) केली आहे. त्यात पोलीस अधिकाऱ्यांचा (Police Officer) समावेश असून, राजस्थान (Rajsthan) मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबलने दिलेल्या तक्रारीवरून राजस्थान पोलिसांनी (Rajsthan Police)  याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. वश करून घेण्यासाठी काळ्या जादूचा वापर करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. 

राजस्थान येथील चुरु जिल्ह्यातील एका पोलीस स्थानकातील एका महिला कॉन्स्टेबलने तत्कालीन पोलीस अधिकारी मिळून चार पोलीस अधिकाऱ्यांनी सामूहिक बलात्काराचे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. २०१७ ते २०२५ दरम्यान सामूहिक बलात्काराचा प्रकार घडला. धमकावून व जबरदस्तीने अमली पदार्थ पाजून पोलीस स्थानकात, हॉटेलमध्ये अनेक वेळा आपल्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महिला कॉन्स्टेबलने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षकांनी सिद्धमुख पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. पीडीत तक्रारदार महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. 

महिला पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस अधीक्षक जय यादव यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केल्यावर एकूण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. आणि याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. एसएचओ व इतर पोलिसांविरुद्ध  सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली आहे. २०१७ मध्ये सरदार शहरात विकी नावाच्या एका इसमाशी भेट झाली. तो वीज विभागाच्या पथकासह आला होता. जय बाबू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीकडे काळ्या जादूचे ज्ञान होते. काळी जादू करून एका कॉन्स्टेबलने तिला पाणी पाजले. त्यानंतर बेशुद्ध पडल्यावर जयबाबू या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिला कॉन्स्टेबलने केला. त्यानंतर एका  कॉन्स्टेबलने ‘ड्युटी’ असल्याचे सांगून पहाटे ३.३० वाजता पोलीस स्थानकात बोलावले व नंतर हॉटेलमध्ये नेऊन अमली पदार्थ पाजून बलात्कार केला.

एका पोलीस स्थानकाच्या एसएचओने दलिया बनवू असे सांगून आपल्या राहत्या क्वार्टर मध्ये बोलावले व बलात्कार केला. तिच्या विभागातील कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. पोलीस अधीक्षक जय यादव यांनी सांगितले की, बलात्काराची तक्रार करणारी पीडित कॉन्स्टेबलला 'ड्युटी'वर गैरहजर राहिल्याने व गुन्हेगारी प्रकरणांत असल्याचा आरोप असल्याने दोन महिन्यांपासून निलंबित करण्यात आले आहे. 

दरम्यान, याप्रकरणी काहीजणांना निलंबित करण्यात आले असून, पुढील तपास करून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

हेही वाचा