आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या कार्यालयावर आंदोलकांची धडक

पणजी: चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉलचा वाद आता अधिकच चिघळला असून, संतप्त ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. आमदार सरकारसोबत आहेत की चिंबलच्या जनतेसोबत? असा थेट सवाल करत ग्रामस्थांनी आमदारांच्या कार्यालयाला घेराव घातला. यावेळी भायर यो भायर यो.. आमका नाका, आमका नाका युनिटी मॉल आमका नाका अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
आंदोलकांनी केवळ आमदारांचाच नव्हे, तर स्थानिक पंच आणि जैवविविधता समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांचाही तीव्र निषेध केला. ज्या जागेवर पूर्वी आयटी पार्क होणार होते, तिथे अचानक युनिटी मॉल कसा आला, असा सवाल करत कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प गावात होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
आंदोलकांचे पाच प्रतिनिधी चर्चेसाठी आले तर त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी : रुडॉल्फ
या आंदोलनावर आपली बाजू स्पष्ट करताना आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी चर्चेचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, युनिटी मॉलला विरोध करणारे लोक आतापर्यंत एकदाही माझ्याकडे चर्चेसाठी आलेले नाहीत. मी सर्व जमावाशी एकाच वेळी बोलू शकत नाही, मात्र आंदोलकांचे पाच प्रतिनिधी चर्चेसाठी आले तर त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची माझी तयारी आहे. शिवीगाळ किंवा आरडाओरडा सुरू असल्यामुळे मी बाहेर पडलो नाही, मात्र प्रेमाने संवाद साधल्यास मार्ग निघू शकतो. तोयार तळ्याच्या संदर्भात आमदारांनी ग्वाही दिली की, या तळ्याला कोणताही धोका पोहोचू दिला जाणार नाही आणि स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही तळे सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, प्रकल्पाला मान्यता देण्यापूर्वी सरकारने स्थानिक लोकांना विश्वासात घ्यायला हवे होते, असेही आमदारांनी मान्य केले.
यावेळी आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आरजीचे नेते हिंसक पद्धतीने वागत असून ते जमिनींचे दलाल बनले आहेत, अशी टीका त्यांनी केली. या नेत्यांना कोण आर्थिक मदत पुरवते याची मला पूर्ण माहिती असून योग्य वेळी त्यांची नावे जाहीर करेन, असा इशाराही त्यांनी दिला. २८ डिसेंबरपासून सुरू असलेले हे आंदोलन आता अधिक तीव्र झाले असून, तोयार तळ्याकाठी झालेल्या जाहीर सभेनंतर ग्रामस्थ आता कायदेशीर आणि रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत.